Bhaurao Chavan Sugar Factory pudhari photo
नांदेड

Bhaurao Chavan Sugar Factory : पाच कोटींच्या नोटिशीने शेतकर्‍यांचा आवाज दाबता येणार नाही!

भाऊराव चव्हाणच्या प्रशासनाला गाढे यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नांदेड :शेतकर्‍यांच्या उसाला प्रतिटन चार हजार रुपये भाव द्यावा, वजनातील काटामारी थांबवावी, रिकव्हरीतील कथित गैरव्यवहारांची चौकशी करावी आणि थकीत देणी तातडीने द्यावीत, या मागण्या उपस्थित केल्यामुळे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने पाच कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मात्र अशा नोटिशीने शेतकर्‍यांचा आवाज दाबता येणार नाही. माझ्यावरील आरोप खरे असतील तर कारखाना प्रशासनाने न्यायालयात जाऊन दावा दाखल करावा, असे खुले आव्हान बालाजी गाढे पाटील यांनी शनिवारी येथे दिले.

माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण यांनी कारखान्याची बदनामी केल्याबद्दल गाढे पाटील यांना पाच कोटींच्या भरपाईची नोटीस पाठविली आहे. त्यावर शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्या मांडल्या तर कारखान्याची बदनामी कशी होते, असा सवाल गाढे यांनी केला.

शेतकरी आंदोलक प्रल्हाद इंगोले यांनी २०१३ साली कारखान्याकडे शेतकर्‍यांचे ५ कोटी ११ लाख ४२ हजार रुपये थकीत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर शासनाच्या समितीच्या अहवालात १ कोटी ८१ लाख ६८ हजार ५२ रुपये ८९ पैसे देणे बाकी असल्याचे निष्पन्न झाले होते. या रकमेची व्याजासह परतफेड करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी २०१७मध्ये दिले होते. मात्र अद्यापही शेतकर्‍यांना ही रक्कम मिळालेली नाही याकडे गाढे पाटील यांनी लक्ष वेधले.

कारखान्याने आपल्या विरुद्ध खुशाल दावा दाखल करावा, असे सांगतानाच जर कारखाना प्रशासनाने दावा दाखल केला नाही तर शेतकरी आणि सभासदांच्या हक्कांच्या लढ्याची बदनामी केल्याप्रकरणी आपणही न्यायालयीन लढा उभारणार असल्याचे गाढे पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांना योग्य भाव आणि थकीत रक्कम मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्यासोबत कारखान्याचे सभासद केशव शिंदे, माणिका मुंगल, बालाजी शिंदे, प्रकाश शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT