नांदेड ः 30 वर्षांची उज्ज्वल परंपरा सांगणा-या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे कारभारी जिल्ह्यात अव्वल असले, तरी यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील अन्य साखर कारखानदार उसाचा पहिला हप्ता 2600 रूपयांच्या च्या पुढे देत असताना भाऊराव मात्र 2400 रुपयांवर अडकला आहे.
गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर उसाच्या किफायतशीर दरासाठी जिल्ह्यातील कारेगाव फाट्यावर कोयता बंद आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांना पहिल्या हप्त्याची घोषणा आंदोलनस्थळी येऊन करावी लागली. या आंदोलनात प्रहार संघटनेचे प्रमुख, माजी मंत्री बच्चु कडू सहभागी झाले होते.
गेल्या बुधवारी झालेल्या वरील आंदोलनात सायंकाळनंतर बच्चु कडू सहभागी झाल्यानंतर त्यांनी तेथे हजर असलेल्या कारखाना प्रतिनिधींना फैलावर घेतले. आंदोलनाच्या आक्रमक पवित्र्यानंतर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी पहिला हप्ता जाहीर केला.
कुंटूरकर शुगर्स (प्रतिटन 2700), वाघलवाडा व कवळे उद्योग समूह (2600 रु.), सुभाष शुगर, हदगाव (2725 रु.) या खाजगी साखर कारखानदारांनी आपला दर तेथे जाहीर केल्यानंतर या सर्वांमध्ये थोरल्या असलेल्या भाऊराव चव्हाणच्या कार्यकारी संचालकांनी तांत्रिक कारण देत पहिला हप्ता म्हणून 2390 रु. देता येतील, असे सांगितले. त्यावर बच्चु कडू आणि इतर आंदोलक संतापल्याचे दिसून आले.
भाऊराव चव्हाणच्या प्रशासनाने येत्या पात्र दिवसांत पहिली उचल म्हणून उचित दर जाहीर केला नाही तर या कारखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा कडू यांनी तेथेच दिला. वरील आंदोलनामध्ये कॉ. राजन क्षीरसागर, भगवान मनुरकर, साईनाथ रोषणगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.