School Nutrition Scheme : शालेय पोषण आहारातून केळी, अंडी गायब file photo
नांदेड

School Nutrition Scheme : शालेय पोषण आहारातून केळी, अंडी गायब

तांदूळ, डाळ, कडधान्यांवर भर

पुढारी वृत्तसेवा

Bananas, eggs missing from school nutrition

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: शालेय पोषण आहार योजनेचे नाव आता 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना' असे झाले आहे. या योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या धान्याचा दर्जा राखण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने भर दिला आहे. दरम्यान, या पोषण आहारातून अंडी आणि केळी मात्र गायब झाले आहेत. सध्या थंडी चांगली पडू लागल्याने अंड्यांची उणीव भासत असल्याने चर्चेला पेव फुटले आहे.

मागील शैक्षणिक वर्षात शालेय पोषण आहारात अंड्यांच्या समावेशाबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जातीने लक्ष घातले होते. शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्याबाबत नित्यनेमाने चर्वितचर्वण होत असे. शाकाहारी विद्यार्थ्यांना केळी तर अन्य विद्यार्थ्यांना अंडी दिली जात असत; परंतु २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात मात्र आहारात बदलण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दोन आठवड्यांचा मेनू तयार केला असून सोयावडी आवर्जून दिली जाते. गतवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मिलेट बार हा पोषक पदार्थ किनवट, माहूर या आदिवासी तालुक्यात दिला गेला.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सुधारित पाककृती बदलाबाबत स्वतंत्र निर्देश देण्यात आले असून आठवड्याचे वेळापत्रक ठरवून देण्यात आले आहे. श्री अन्न म्हणून मान्यता प्राप्त डाळ व कडधान्याबरोबरच तांदळाचा त्यात समावेश आहे. प्रत्येक सोमवारी व्हेजिटेबल पुलाव, मंगळवारी मुग शेवग्याचे वरण आणि भात, बुधवारी मटार पुलाव, गुरुवारी चवळीची खिचडी, शुक्रवारी मसुली पुलाव आणि शनिवारी सोयाबीन पुलाव देण्यात येत आहे.

दुसऱ्या आठवड्यात सोमवार ते शनिवारी अनुक्रमे मसाले भात, मोड आलेल्या मटकीची उसळ व भात, मूगडाळ खिचडी, चना पुलाव, मुग शेवग्याचे वरण आणइ भात तसेच सोयाबीन पुलाव अशा प्रकारे प्राथमिक विद्यार्थ्यांना पोषक आहार दिला जातो. आहाराचा हा मेनू मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निश्चित केला असून शाळेत अन्न शिजवल्यानंतर प्रातिनिधिक स्वरुपात पालकांनी व शिक्षकांनी त्याची चव घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दर्जाबाबत तडजोड नाही भारतीय अन्न महामंडळाच्यावतीने (एफ.सी.आय.) तांदळाचा पुरवठा केला जातो. हा तांदूळ नवीन असावा याबाबत आम्ही आग्रही आहोत. प्रत्यक्ष भेट देऊन तांदूळ घेतला जातो. याशिवाय विद्यार्थ्यांना आवडेल अशी सोयावडी दिली जाते. ज्या आहारात पोषण मूल्य अधिक आहे, असा चविष्ट आहार देण्याबाबत स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी आग्रही आहेत. मध्यंतरी अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी काही शाळांना भेटी देऊन पोषण आहाराबाबत समाधान व्यक्त केले.
-नीळकंठ पाचंगे, लेखाधिकारी तथा नोडल अधिकारी, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, जिल्हा परिषद नांदेड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT