Banana orchards damage : वादळी वाऱ्याच्या तडाख्याने केळीच्या बागा भुईसपाट ! file photo
नांदेड

Banana orchards damage : वादळी वाऱ्याच्या तडाख्याने केळीच्या बागा भुईसपाट !

मुदखेड तालुक्यातील बागायतदारांचे लाखोंचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Banana orchards flattened by strong winds!

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मुदखेड तालुक्यातील निर्यातक्षम केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निर्यातीसाठी तयार असलेल्या दर्जेदार केळीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तालुक्यातील बारड, पांढरवाडी, निवघा, इजळी शेंबोली यासह इतर शिवारातील शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागांचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार मारुती जगताप यांनी दिली.

मात्र त्यानंतर पुन्हा ३१ मे रोजी आलेल्या वादळाने निवघा व इजळी परिसराला जोरदार तडाखा दिला. निवघा येथील शेतकरी संजय शंकरराव पवार व इतर अनेक शेतकऱ्यांच्या निर्यातक्षम केळीच्या बागा वाऱ्याच्या तडाख्यात भुईसपाट झाल्या असून नुकसानीची विदारक दृश्ये समोर आली आहेत. काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या केळीच्या बागा क्षणार्धात कोसळल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान, केळी पिकासाठी हेक्टरी दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च येत असताना, एनडीआरएफच्या निकषानुसार केळीच्या नुकसानीसाठी केवळ २२ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाते. ही मदत अत्यंत तुटपुंजी असून सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे, अशी टीका भोकर मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ता संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी केली. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी किमान २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः डोळ्याच्या समोर केळी बागा उद्ध्वस्त झाल्याने आम्ही हवालदिल आहोत. दरवर्षी केळी बागांचे नुकसान सुरू आहे. यावर्षी केळीला चांगला दर असताना हातात चांगले उत्पन्न पडण्याची अपेक्षा होती. परंतु आस्मानी संकटाने आमच्या अपेक्षांवर घाला घातला आहे.
- संजयराव पवार, केळी उत्पादक शेतकरी, निवघा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT