Nagpur Tuljapur Highway Protest
उमरखेड: प्रहारचे संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवत सरकारला धारेवर धरले आहे. त्यांच्या पदयात्रेने सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. दरम्यान, बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण नागपूर- तुळजापुर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्या प्रकरणी त्यांच्यासह १२ जणांवर महागाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
बच्चू कडू यांच्या सात-बारा कोरा या पदयात्रेची समारोपीय सभा सोमवारी अंबोडा येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे नियोजित होती. मात्र ऐनवेळी बच्चू कडू यांनी समारोपीय सभा आंबोडा उड्डान पुलावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर घेतली. ट्रॅक्टर महामार्गवर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. याप्रकरणी बच्चू कडूंसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल तीन तास दोन्ही बाजुची वाहतुक ठप्प झाली होती.
आंबोडा येथील श्री गजानन महाराज मंदिर ग्राम या ठिकाणी सातबारा कोरा यात्रा समारोपीय सभा नियोजित होती. परंतु, ही पदयात्रा आंबोडा गावात दुपारच्या सुमारास नागपूर ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर पोहोचली. या पदयात्रेमध्ये बच्चू भाऊ कडू यांचे नेतृत्वात पाच ते सात हजार जनसमुदाय उपस्थित होता. यासह ३० ते ४० ट्रॅक्टर होते. यातील जमाव राष्ट्रीय महामार्ग खडका ते आंबोडापर्यंत दोन्ही बाजूंनी चालत होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. त्यांना वारंवार पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी यांनी महामार्गाच्या एका बाजूने चला, असे वारंवार सांगितले. तरी सुद्धा त्यांनी ऐकले नाही. तसेच ही पदयात्रा समारोपीय सभा श्री गजानन महाराज मंदिर आंबोडा येथे नियोजित असताना ऐनवेळी आंबोडा पुलावर घेतली.
तसेच पदयात्रा संबंधाने आयोजकांनी कुठलेही कायदेशीर परवानगी घेतली नाही. परिणामी, आयोजकांनी बेकायदेशीर जमाव जमवून नियोजित ठिकाणी सभा न घेता उड्डाण पुलावर ट्रॅक्टर आडवे करुन सभा घेतली. मोठ्या संख्येचा जमाव राष्ट्रीय महामार्गामध्ये बसवून वाहतूक थांबविली. तसेच प्रतिबंधक आदेशाचे उल्लघंन केले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.