मनपातील कारभार लोकाभिमुख व पारदर्शक असावा pudhari photo
नांदेड

Ashok Chavan : मनपातील कारभार लोकाभिमुख व पारदर्शक असावा

तक्रारी व भानगडी खपवून घेणार नाही : अशोक चव्हाण

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः नांदेड महानगरपालिकेतील कारभार हा लोकाभिमुख व पारदर्शक असला पाहिजे, नांदेडच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कामांना गती मिळाली पाहिजे, महापालिकेत तक्रारी व भानगडी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी महापौर व उपमहापौर पदग्रहण सोहळ्यात दिला.

नांदेड महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाच्या अधिकृत निवडीनंतर महापालिका परिसरात पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. व्यासपीठावर खासदार अजित गोपछडे , माजी मंत्री डी.पी. सावंत,आमदार बालाजी कल्याणक, आमदार आनंद बोंढारकर, अमरनाथ राजूरकर, राम पाटील रातोळीकर, नवनिर्वाचित महापौर कविता संतोष मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, महेश कुमार डोईफोडे,गटनेते महेश कनकदंडे ,मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे,संतुकराव हंबडर्,े दिलीप कंदकुर्ते,चैतन्य बापू देशमुख, प्रवीण साले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले, या शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता आम्ही सर्व कटीबद्ध आहोत,ही ग्वाही देण्यासाठी मी आणि माझे सहकारी या ठिकाणी आलेलो आहोत. मनपा निवडणुकीचा काय निकाल लागेल, याची खात्री नव्हती. पण लोकांनी हे दाखवून दिले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे नेतृत्व देवाभाऊ यांच्या खंबीर नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेडचा पाया रचण्याची वेळ आली आहे आणि म्हणून लोकांनी बहुमताने आम्हाला निवडून दिले.

लोकांनी साथ दिली नसती तर नांदेड मनपावर भाजपचा झेंडा फडकविणे शक्य झाले नसते. त्यामुळे सर्वप्रथम नांदेडच्या जनतेचे मी आभार मानतो. जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे नांदेडच्या इतिहासामध्ये भाजपाचा पहिला महापौर विराजमान झाला आहे. शिवसेनेनेही भाजपला विनाअट पाठिंबा दिल्यामुळे महापौर व उपमहापौर निवडणुकीत महायुतीची सदस्य संख्या 50 झाली असेही खासदार अशोक चव्हाण म्हणाले.

नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात करायची आहे, सर्व नगरसेवकांना शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना मी आयुक्तांना यापुर्वीच दिल्या आहेत. शंभर दिवसांच्या कार्यक्रमांचा आढावा घेऊन सर्व नगरसेवकांच्या कामाची पद्धत जाणून घेतली पाहिजे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक होणे गरजेचे आहे, याकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता असून चांगल्या कामाला कोणी विरोध करणार नाही, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

जनतेला विनाकारण महापालिकेत जाण्याची गरज पडत नाही, ऑनलाईन सर्व्हिसेस उपलब्ध करून देण्यात आली असून या माध्यमातून आपल्याला अतिशय सुलभ सुविधा उपलब्ध करून देता येथील. शहरातील वाहतूक समस्या, गोदावरी नदीचे शुद्धीकरण आदी विषयांना प्राधान्यक्रम दिला पाहिज,असे आवाहन चव्हाण यांनी केले.

भाजपचा जाहीरनामा म्हणजे आपला संकल्पनामा असून त्याद्वारे आपण जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी करता येईल यासाठी सर्व नगरसेवकांनी प्रयत्नशील राहावे, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांनी केले. याप्रसंगी खासदार अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर,अमरनाथ राजूरकर, महेश कनकदंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सेवेसाठी खुर्ची-महापौर

मला मिळालेली खुर्ची ही पदासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहे. सेवाभाव जपत मी नांदेडच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन नवनिर्वाचित महापौर कविता संतोष मुळे यांनी यावेळी दिले. मला या पदासाठी योग्य समजल्याबद्दल भाजपच्या सर्व वरिष्ठांचे आभार मानले. उपमहापौर दीपकसिंह रावत यांनीही नांदेडच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT