Ashok Chavan bank visit pudhari photo
नांदेड

Nanded Political News : खा. चव्हाणांच्या भेटीप्रसंगी आ. चिखलीकरांची बँकेकडे पाठ !

नोकरभरतीत गुणवत्ता व पारदर्शकता राखण्याचा आग्रह

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयास दिलेल्या भेटीदरम्यान त्यांच्या गोतावळ्यातील बहुसंख्य संचालक आवर्जून हजर राहिले, तर आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह काही संचालकांनी मात्र बैंककडे पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे. या मेटीदरम्यान खा. चव्हाण यांनी बँकेची सद्यस्थिती तसेच बँकेच्या समस्या जाणून घेतल्या तसेच आगामी काळातील नोकरभरती गुणवत्तेनुसार पारदर्शकपणे झाली पाहिजे असे सर्वांना बजावले.

सुमारे दीड महिन्यांपूर्वी या बँकेवर नवे संचालक मंडळ आले. त्यांतील बहुतांश संचालक नवीन आहेत. निवडणुकीनंतर बँकेच्या अध्यक्षपदी भाजपाचे आमदार डॉ. तुषार राठोड, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांची बिनविरोध निवड झाली होती. या दोन पदाधिकाऱ्यांच्या निमंत्रणावरून खा. चव्हाण यांनी गेल्या शुक्रवारी आ. अमरनाथ राजूरकर यांच्यासह बँकेच्या मुख्यालयास भेट दिली.

खा. चव्हाण यांची 'बँकभेट' निश्चित झाल्यानंतर सर्वच संचालकांना शुक्रवारी सायंकाळी उपस्थित राहण्यासंदर्भात बँकेच्या मुख्यालयातून निरोप (संदेश) देण्यात आला होता. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, त्यांच्या कन्या प्रणिता देवरे, हदगावचे कृष्णा पाटील आष्टीकर यांनी उपस्थित राहण्याचे टाळले. आ. भीमराव केराम, पूनम राजेश पवार हे संचालकही गैरहजर होते; पण नंतर चिखलीकर व त्यांच्या कन्येच्या अनुपस्थितीची संबंधितांत चर्चा झाली. मात्र स्वतः चव्हाण यांनी त्यावर कोणतेही भाष्य केले नाही.

बँकेच्या ऑगस्ट महिन्यातील संचालक मंडळाच्या सभेलाही चिखलीकर व त्यांच्या कन्या अनुपस्थित होत्या. या सभेची तारीख निश्चित करण्यापूर्वी पूर्वाध्यक्षांच्या परंपरेनुसार विद्यमान अध्यक्षांनी प्रमुख संचालकांशी विचारविनिमय केला नव्हता. या सभेची तारीख कळण्याआधीच चिखलीकर यांनी आपल्या मतदारसंघात काही कार्यक्रम निश्चित केले होते. त्यामुळे त्यांना बँकेच्या सभेसाठी वेळ काढणे जमले नाही. त्यानंतर चव्हाण यांच्या भेटीचा निरोपही अचानकपणे एका कनिष्ठ अधिकाऱ्याकडून दिला गेला, ही बाब चिखलीकर यांना खटकली. या प्रकारानंतर त्यांनी थेट कोणावरही निशाणा साधला नाही; पण बँकेच्या निवडणुकीत आम्ही जो काही निर्णय केला, तो बरोबर होता का चूक हे तपासण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

खा. चव्हाण यांचे बँकेच्या मुख्यालयात आगमन झाल्यानंतर प्रथम अध्यक्ष डॉ. तुषार राठोड यांनी त्यांचे तसेच आ. राजूरकर यांचे शाल, श्रीफळ अर्पण करून सत्कार केला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम यांनी एक सविस्तर टिपणी उपस्थितांसमोर सादर केली. बँक आता दीर्घ कालावधीनंतर संचित तोट्यातून बाहेर आली असली, तरी शेजारच्या जिल्हह्यांच्या मध्यवर्ती सहकारी बँकांची स्थिती पाहता नांदेड बँकेला मजबूत करण्यासाठी सर्वांनाच झटावे लागणार असल्याचे निदान खा. चव्हाण यांनी केले. त्यांचे एक समर्थक संचालक रामचंदर मुसळे यांनी बँकेचा लेखा परिक्षण अहवाल आम्हाला मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. ती चव्हाण यांनी फेटाळून लावल्याचे सांगण्यात आले.

  • खा. चव्हाण यांच्या भेटीमध्ये बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचा व त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यावर चव्हाण यांनी नोकरभरतीवरील स्थगिती उठविण्यासंदर्भातील प्रयत्नांना गती देण्याची सूचना अध्यक्ष व बैंक प्रशासनाला दिली; पण स्थगिती उठल्यानंतर बँकेतील वेगवेगळ्या १५६ पदांची भरती शासनाच्या निर्देशानुसार आयबीपीएस किंवा टीसीएस या नामांकित संस्थांकडूनच झाली पाहिजे. तसेच त्यात गुणवत्ता व पारदर्शीपणा राखलाच पाहिजे, असे खा. चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले. काही संचालकांच्या मनात वेगळे काही सुरू असेल, तर ते त्यांनी विसरले पाहिजे, असा टोला त्यांनी जुन्या संचालकांना उद्देशून लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT