Nanded DCC Bank pudhari photo
नांदेड

Nanded DCC Bank : चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच धनिकांकडून ‘लक्ष्मीदर्शन’ सुरू!

खा.चव्हाणांचे धोरण; अनिश्चिततेचे कारण : अनेक इच्छूक सैरभैर...

पुढारी वृत्तसेवा

संजीव कुळकर्णी

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळामध्ये आपला वरचष्मा राखण्यासाठी खा.अशोक चव्हाण यांनी सर्व प्रकारची जुळवाजुळव सुरू केली, तरी भाजपा व मित्रपक्षांतील अनेक इच्छुकांना त्यांनी अधांतरी ठेवले आहे. दुसरीकडे या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच काही धनसम्राटांनी जिल्हाभर ‘लक्ष्मीदर्शन’ सुरू केल्याची चर्चा होत असून अनेक इच्छुक उमेदवार सैरभैर झाले आहेत.

वरील निवडणुकीतील निर्णायक घडामोडी पुढील आठवड्यात १३ ते १५ जुलै दरम्यान होतील, असे दिसते. निवडणूक बिनविरोध होणार काय, किंवा मागील खेपेप्रमाणे दोन गटांमध्ये लढत होणार का, ते अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १६ जुलै रोजी स्पष्ट होईल. या निवडणुकीतूून बाद झालेले आ.प्रताप पाटील चिखलीकर आणि चव्हाण समर्थक गोविंद शिंदे नागेलीकर यांच्या अपिलावर शुक्रवारी लातूर येथे सुनावणी झाली. त्यांचे भवितव्य येत्या सोमवारी निश्चित होईल.

भाजपाचे काही आमदार निवडणूक रिंगणात आहेत. ‘राष्ट्रवादी’चे प्रताप पाटील हेही निवडणूक प्रक्रियेत आहेत. पण खा.चव्हाण आणि वरील आमदारांमध्ये आतापर्यंत समन्वय किंवा ताळमेळ दिसून आलेला नाही. भाजपाच्या एका आमदाराने महिलांच्या राखीव जागेवर आपल्या पत्नीला उमेदवार करण्याचे निश्चित केले असून माघार न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. मुखेडमध्ये राठोड बंधूंनी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघाची जागा कोणासाठीही सोडायची नाही, अशी भूमिका घेत बेटमोगरेकरांशी ‘सामना’ करण्याची तयारी ठेवली आहे.

उमरी-धर्माबाद, नायगाव इत्यादी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघ तसेच जिल्हा स्तरावरील सात जागा यावरून बरेच दावे-प्रतिदावे आहेत. त्यांत आतापर्यंत तोडगा निघालेला नाही. सर्व प्रस्थापित नेते आपापल्या जागा सुरक्षित करण्याच्या खटाटोपात असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक नवोदितांवर सैरभैर होण्याची वेळ आली आहे.

मागील काही वर्षांपासून दूर्धर आजाराशी संघर्ष करणारे बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळीकर यांनी आपल्या १९९२ पासूनच्या पारंपरिक मतदारसंघातून मुलगा मुकेश पाटील यास बँकेवर आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. गेल्या निवडणुकीत खा.चव्हाण यांना टाकळीकर व हरिहर भोसीकर यांची महत्त्वपूर्ण साथ लाभली; पण आता या दोघांच्या मुलांना वार्‍यावर सोडण्याचे ‘अमर कर्तव्य’ पार पाडले जात आहे.

भोसीकरांचे पुत्र शिवकुमार यांस आधी आश्वस्त केले गेले; पण आता त्यांना फिरवले जात आहे. इकडे जा, तिकडे जा असे सल्ले शिवाजीनगरातून दिले जात आहेत. भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या पत्नीस अर्ज भरण्याची सूचना दिली गेली; पण नंतर त्यांना लटकवून ठेवण्यात आले. रविवारनंतर चार दिवसांत बर्‍याच बाबी स्पष्ट होणार असल्या, तरी खा.चव्हाण यांच्या कार्यशैलीने अनेकांना बुचकाळ्यात टाकले आहे.

  • खा.चव्हाण यांनी आपल्या लाडक्या भोकर विधानसभा मतदारसंघातील सेवा सहकारी सोसायट्यांच्या तालुकास्तरीय मतदारसंघातील तीन जागांवर कोणा उभे करायचे, याची चाचपणी चार दिवसांपूर्वी केली; पण इच्छुकांना मोठ्या आर्थिक तरतुदीची सोय करा, असे सांगण्यात आले आहे. त्यातून वरील निवडणुकीत प्रचंड आर्थिक व्यवहार होणार, हे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT