Ashok Chavan : कर्ज काढून उसाला भाव देऊ नका ! file photo
नांदेड

Ashok Chavan : कर्ज काढून उसाला भाव देऊ नका !

खा. अशोक चव्हाण यांचा जिल्ह्यातील कारखानदारांना सल्ला !

पुढारी वृत्तसेवा

Ashok Chavan: Do not pay the sugarcane price by taking on debt

नांदेड : कर्ज काढून उसाला भाव देऊ नका, अन्यथा एनपीए वाढला तर बँका तुम्हाला दारात उभ्या करणार नाहीत असा मोलाचा सल्ला खा. अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील कारखानदारांना दिला आहे. कर्ज काढून भाव देणारे कारखाने बंद झाले, आपल्याला कारखाना बंद करायचा की चालू ठेवायचा आहे? असे म्हणत खा. चव्हाण यांनी सालाबादप्रमाणेच भाऊराव समूहाकडून ऊस दर जाहीर न करण्याची भूमिका याही वर्षी चालू ठेवली.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या ३१ व्या गळीत हंगाम रविवार ११ ऑक्टोबर रोजी पार पडला. शुभारंभप्रसंगी खासदार अशोक चव्हाण यांनी कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांच्याकडे बोट दाखवत ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव द्यावा, अशी विनंती केली. मात्र, त्याचवेळी शेजारच्या कारखान्याने एवढा भाव दिला म्हणून त्यापेक्षा जास्त भाव द्यावा का? याचेही त्यांनी आर्थिक गणित मांडले.

जिल्ह्यात सुभाष शुगरने प्रतिटन ३२०० रुपये, तर कवळे गुरुजी यांच्या व्हीपीके ग्रुपने ३४०० रुपये दर जाहीर केला आहे. त्यामुळे भाऊराव चव्हाण कारखाना किती दर जाहीर करणार, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर खा. अशोक चव्हाण यांनी ऊसदासोबतच कारखान्यांच्या आर्थिक गणिताचा मुद्दा उपस्थित केला.

"संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. भाव बसत नसताना बाजूच्या कारखान्याने एवढा दिला म्हणून शंभर रुपये जास्त द्यायचे; पण तुझा भाव एवढा बसतो का?" असा सवाल खा. अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. प्रत्येक कारखान्याला किती भाव देणे शक्य आहे, याचे गणित संबंधित भागातील उसाची लागवड किती आहे, उसाचे वजन आणि गाळप किती झाले, साखरेची रिकव्हरी किती आहे, या बाबींवर ऊसदराचे गणित ठरते. त्यामुळे केवळ दराच्या स्पर्धेत उतरून कर्ज काढून शेतकऱ्यांना भाव देण्यापेक्षा कारखान्याची आर्थिक क्षमता लक्षात घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कारखान्याच्या कर्जाचे रूपांतर एनपीएमध्ये झाले तर बँका तुम्हाला दारात उभे करणार नाहीत, असा इशाराही खा. अशोक चव्हाण यांनी दिला. कर्ज काढून ऊसदर देणारे कारखाने बंद झाल्याचे सांगत, कारखाना बंद करायचा की चालू ठेवायचा, याचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यातून कारखान्यांच्या आर्थिक शिस्तीबाबत व्यवस्थापनाला एक प्रकारे सुनावण्यात आल्याचे दिसते. याप्रसंगी आपल्या भागातील ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त ऊसदर देण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच कारखान्याची आर्थिक स्थिती बिघडणार नाही, याची काळजी घेण्याचा संदेश खा. अशोक चव्हाण यांनी दिला.

नरेंद्र चव्हाण यांनी जास्तीत जास्त भाव द्यावा

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या ३१ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी खासदार अशोक चव्हाण यांनी अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांच्याकडे निर्देश करीत ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव द्यावा, असे सूतोवाच केले. सुभाष शुगरचा ३२०० रुपये आणि व्हीपीके ग्रुपचा ३४०० रुपये प्रतिटन दर जाहीर झाल्याने भाऊराव चव्हाण कारखाना किती दर देणार, याची उत्सुकता वाढली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT