विशेष प्रतिनिधी
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर शहरातील बहुसंख्य मुस्लिम नेते काँग्रेस पक्षासोबत राहिले. चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावर वेळोवेळी टीका करून या नेत्यांनी त्यांना यातना दिल्या; पण मनपात भाजपाची सत्ता आल्यानंतर याच मुस्लिम नेत्यांवर याचना करण्याची वेळ आली आहे.
खा.चव्हाण गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये असून तेथील वास्तव्यात भाजपाच्या एका माजी आमदारांसह काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. त्याची बाहेर चर्चा झाली नाही; पण काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष, माजी महापौर अब्दुल सत्तार यांचेपुत्र अब्दुल गफार यांनीही सोमवारी चव्हाण यांची भेट घेतल्याची बाब मात्र येथे चर्चेचा विषय बनली आहे.
मनपामध्ये भाजपाचे महापौर-उपमहापौर झाल्यानंतर नव्या महापौरांना विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करायची आहे. हे पद काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या गटाला मिळावे, अशी काँग्रेसची मागणी आहे, तर दुसऱ्या बाजूला एमआयएम पक्षाने आपल्या 14 जणांच्या संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर खा.चव्हाण यांची अब्दुल सत्तार यांच्या मुलाने मुंबईत जाऊन घेतलेली भेट चर्चेत आली.
अब्दुल गफार हे काँग्रेस पक्षातर्फे मनपावर निवडून आले असून विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असले, तरी स्वतंत्र पक्ष म्हणून काँग्रेसचे मनपातील संख्याबळ एमआयएमपेक्षा कमी आहे. पण काँग्रेसची वंचितसोबत निवडणूकपूर्व आघाडी होती त्यामुळे या दोघांचे संख्याबळ एमआयएमपेक्षा जास्त आहे, असा मुद्दा मांडण्यात आला असला, तरी त्याला कायदेशीर आधार नाही.
खा.चव्हाण यांची भेट घेऊन अब्दुल गफार यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी याचना केल्याची माहिती बाहेर आल्यानंतर पक्षातील अनुभवी कार्यकर्त्यांनी नापसंती व्यक्त केली. काँग्रेसच्या अन्य काही नगरसेवकांनीही चव्हाण यांची स्वतंत्रपणे भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. एक-दोघांनी तर ‘आम्ही तुमचेच’ असा पवित्रा घेतला.
आगामी काळातील विधान परिषद-स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही तुमच्यासोबत राहूत, असा शब्दही काँग्रेसच्या नगरसेवकांनी खा.चव्हाण यांना दिला. आमच्या प्रभागातील कामांमध्ये मदत करा, अशी विनंतीही त्यांनी खा.चव्हाणांकडे केली.
येथे मिळालेल्या माहितीनुसार खा.चव्हाण यांनी अब्दुल गफार यांचे म्हणणे ऐकून घेतले; पण विरोधी पक्षनेता नियुक्तीची प्रक्रिया कायद्यातील तरतुदीनुसार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महापौर प्रतिनिधी संतोष मुळे हेही चव्हाण यांना भेटून नांदेडमध्ये परतले. महेश खोमणे यांनीही चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली.
नांदेड मनपाच्या महापौर-उपमहापौरांच्या निवडीची विशेष सभा होऊन मंगळवारी एक आठवडा पूर्ण झाला. या कालावधीत महापौरांनी विविध भागांमध्ये भेटी दिल्या. जलशुद्धीकरण केंद्रासह गोवर्धन घाट स्मशानभूमी परिसरास भेट दिली. अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
शहरातील साफसफाईचा आढावा घेतला. मनपातील विविध विभागांची माहिती घेतली; परंतु पहिल्या सर्वसाधारण सभेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. या सभेमध्ये स्थायी समितीवरील सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या सभेमध्ये स्वीकृत सदस्य निवडीचा विषय येऊ शकतो, असे सांगण्यात आले.