Ashok Chavan  pudhari photo
नांदेड

Ashok Chavan Birthday : दुष्काळाचे कारण... मुखपत्रात जाहिरातींचे ‘तोरण!’

वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे वास्तव कारण देत भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय एकीकडे जाहीर केला आणि दुसरीकडे त्यांच्या परिवाराशी संबंधित मुखपत्राने वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक हितचिंतकांच्या माध्यमातून जाहिरातींचे ‘तोरण’ बांधल्याचे बघायला मिळाले.

२८ ऑक्टोबर हा खा.चव्हाण यांचा तर २९ ऑक्टोबर हा माजी मंत्री कमलकिशोर कदम यांचा जन्मदिन. कमलकिशोर कदम यांनी प्रदीर्घ राजकीय-सामाजिक जीवनात आपल्या जन्मदिनाचा सोहळा केला नाही किंवा होऊ दिला नाही; पण चव्हाण यांचा वाढदिवस काही अपवाद वगळता मोठा गाजावाजा करूनच साजरा केला गेला आहे.

बुधवारी त्यांनी ६९व्या वर्षात पदार्पण केले. हा दिवस मुद्रित माध्यमांसाठी अनेकदा व्यवसायवृद्धि दिन ठरला आहे; पण यंदा जिल्ह्यातील तसेच विभागातील दुष्काळी परिस्थितीचे कारण देत वाढदिवस साजरा न करण्याचे धोरण चव्हाण यांनी जाहीर केले होते. पण त्यांच्याशी संबंधित वृत्तपत्राने दुष्काळातही जाहिरातींचा सुकाळ कसा असतो, हे बुधवारच्या आपल्या अंकातून समोर आणल्याचे बघायला मिळाले.

खा.चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्सच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देण्यात समर्थकांतील चढाओढ अनेकदा बघायला मिळाली. पण बुधवारी शिवाजीनगर, आयटीआय परिसर ते शारदाभवन शिक्षण संस्था या पट्ट्यात शुभेच्छा फलक लागल्याचे दिसले नाही.

चव्हाण यांचे निकटवर्ती आ.अमरनाथ राजूरकर यांनी यंदा जाहिरात मोहीम कटाक्षाने टाळली. पण चव्हाण यांच्यासोबत भाजपात आलेल्या लोकप्रतिनिधींपैकी अनेकांनी वरील मुखपत्रातल्या जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या लाडक्या नेत्याचे अभीष्टचिंतन केले. या वृत्तपत्रातल्या एका चमूनेही ‘गृह जाहिरात’ प्रसिद्ध करून पोशिंद्यास शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र सरकारकडे मोठी रक्कम अडकल्यामुळे राज्यभरातील कंत्राटदार आणि या व्यवसायातील नोंदणीकृत संस्था अडचणीतून जात आहेत. पण नांदेड जिल्ह्यातील अनेक कंत्राटदारांनी चव्हाण यांना जाहिरातीच्या माध्यमातून शुभेच्छा देताना हात आखडता घेतला नाही.

  • यंदा वाढदिवस साजरा करायचा नाही, हे कुटुंबात ठरल्यानंतर खा.अशोक चव्हाण दोन दिवसांपूर्वी येथून मुंबईला रवाना झाले. त्यापाठोपाठ त्यांच्या काही निकटवर्तीयांनीही मुंबई गाठली. भाजपातील जुन्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी चव्हाण यांना जाहिरातींच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचे टाळले. स्थानिक पक्ष संघटनेकडून कोणताही सामाजिक उपक्रम घेतला गेला नाही. दरम्यान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपाच्या अनेक नेत्यांनी चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT