Legislative Council Elections File Photo
नांदेड

स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुका मार्गी लागण्याची शक्यता !

महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत तब्बल १७ जागा रिक्त

पुढारी वृत्तसेवा

As many as 17 seats are vacant in the Legislative Council of Maharashtra state

संजीव कुळकर्णी

नांदेड : राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा आणि पंचायती तसेच बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये लोकप्रतिनिधींची राजवट आल्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या विभागांतील विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या खोळंबलेल्या निवडणुकाही लवकरच मार्गी लागतील, असे सांगितले जात आहे. सध्या या मतदारसंघाच्या १७ जागा रिक्त असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र विधान परिषदेचे संख्याबळ ७८ सदस्यीय असून स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून २२ सदस्य निवडून दिले जातात. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच जिल्हा परिषदांचे लोकनियुक्त, स्वीकृत आणि पदसिद्ध सदस्य हे या मतदारसंघाचे मतदार असून विधान परिषदेवर जाण्यासाठी राज्यातील ही सर्वांत 'अर्थपूर्ण' आणि महागडी निवडणूक समजली जाते. अनेक दिग्गज नेत्यांनी पूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तथापि काही पक्षांनी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या धनिकांनाही याच मतदारसंघाच्या माध्यमातून आमदारकी बहाल केली होती.

वरील मतदारसंघाच्या २२ जागांपैकी बहुतांश जागा मागील तीन-चार वर्षांपासून रिक्त आहेत. २०२२-२३ दरम्यान अनेक सदस्यांची मुदत संपली; पण तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ ठप्प झाल्यामुळे विधान परिषदेच्या वरील मतदारसंघाची निवडणूक घेता आली नाही. आता या प्रक्रियेतील एक टप्पा पूर्ण झाल्यामुळे वरील मतदारसंघाला नवे मतदार लाभले असून येत्या काळात वरील मतदारसंघाच्या खोळंबलेल्या निवडणुका घेण्यात अडचण राहिलेली नाही, असे भाजपाच्या एका नेत्याने येथे सांगितले.

महाराष्ट्र विधान परिषदेत विधानसभा सदस्यांद्वारे निवडून गेलेल्या ९ सदस्यांची (ज्यांत माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाही समावेश आहे.) मुदत येत्या मे महिन्यामध्ये संपत असून या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यात करावी लागणार आहे. त्यामुळे त्याच सुमारास स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघांमध्ये निवडणूक घेतली जाऊ शकते. विशेषतः ज्या जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक झाली आहे, तेथे कोणतीही अडचण राहिलेली नाही. ही निवडणूक घेण्याची बाब केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेतील आहे.

नांदेडमध्ये जिल्हा परिषदेची

निवडणूक लांबणीवर पडली असली, तरी जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा, नगर पंचायती आणि नांदेड-वाघाळा मनपामध्ये लोकप्रतिनिधी आले आहेत. नांदेड तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये जि.प.च्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत, त्या ठिकाणी विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाची निवडणूक घेता येईल का, याबाबत दोन मतप्रवाह आहेत. एकूण मतदारसंख्येच्या ७० टक्के मतदार असतील, तर या मतदारसंघाची निवडणूक घेता येऊ शकते, असे एका संबंधित नेत्याचे म्हणणे आहे.

याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगच घेऊ शकतो, असे मत महाराष्ट्र विधानभवनाचे माजी सचिव व या विषयातील तज्ज्ञ अनंत कळसे यांनी व्यक्त केले. यासंदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

पाच सदस्यांची मुदत जानेवारी २०२८ पर्यंत

महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांच्या वर्तमान यादीनुसार वरील मतदारसंघातले पाच सदस्य परिषदेमध्ये कार्यरत असून त्यांची मुदत जानेवारी २०२८ पर्यंत आहे. त्यावरून तब्बल १७ जागा रिक्त असल्याचे दिसते. त्यांत मराठवाड्यातील नांदेड, छ. संभाजीनगर-जालना, परभणी-हिंगोली आणि लातूर-धाराशिव-बीड या चारही जागांचा समावेश आहे. त्याशिवाय अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया इत्यादी स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या जागा रिक्त आहेत. २०१० ते २०२२ या काळात नांदेडमधून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसतर्फे अमरनाथ राजूरकर यांनी केले होते. आता ते भाजपामध्ये असून या पक्षाच्या उमेदवारीवर त्यांचाच दावा सांगितला जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT