किनवट तालुक्यात विठ्ठल भक्तिरसाचा दरवळ file photo
नांदेड

Ashadhi Ekadashi : किनवट तालुक्यात विठ्ठल भक्तिरसाचा दरवळ

आषाढी एकादशीनिमित्त मंदिर परिसर रोषणाईने लखलखला

पुढारी वृत्तसेवा

An atmosphere of devotion prevails across Kinwat Taluka on the occasion of Ashadhi Ekadashi

किनवट, पुढारी वृत्तसेवा : आषाढी (देवशयनी) एकादशीनिमित्त शनिवारी (दि. २५) किनवट तालुक्यात सर्वत्र भक्तीचे वातावरण अनुभवास आले. किनवट शहरासह बोधडी व कमठाळा येथील विठ्ठल मंदिरांमध्ये श्री पांडुरंगाची - महापूजा, अभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन व हरिनाम संकीर्तनाच्या कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली असून, महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता.

मंगल प्रभातगीतांच्या गजरात श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरांकडे धाव घेतली. मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला - होता. दिवसभर हरिनामाच्या अखंड गजराने वातावरण भारावून गेले. अनेकांनी उपवास, नामस्मरण व पूजाअर्चा करून विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होत चांगला पाऊस, = भरघोस पीक, शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणि सर्वांच्या आयुष्यात सुख-शांती लाभावी, अशी प्रार्थना केली.

हिंदू धर्मात आषाढ शुद्ध एकादशीला 'देवशयनी' किंवा 'महाएकादशी' म्हणून विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून भगवान श्रीविष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेत जातात, अशी श्रद्धा असून याच दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. वारकरी संप्रदायात या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असून, विठ्ठल नामस्मरण, उपवास आणि हरिभजनाद्वारे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करतात.

वारकरी परंपरेनुसार अनेक भाविकांनी एकादशीचे व्रत पाळत हरिभजन व जागरण केले. द्वादशीला वामनपूजन करून पारणे सोडण्याची परंपराही श्रद्धेने पाळली जाणार असल्याचे मंदिर समित्यांकडून सांगण्यात आले. यंदाही तालुक्यातील अनेक वारकऱ्यांनी पंढरपूरची वारी करून विठूरायाचे दर्शन घेतले, तर इतरांनी स्थानिक मंदिरांमध्ये भक्तिभावाने आषाढी एकादशी साजरी केली.

उपवासाच्या निमित्ताने आंबा, केळी, सफरचंद, डाळिंब आदी फळांना बाजारात मोठी मागणी राहिली. त्यामुळे स्थानिक फळविक्रेत्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळाली. दरम्यान, किनवट शहरातील विठ्ठलेश्वर मंदिरात रात्री आयोजित 'गजर हरिनामाचा' या भजन संध्येला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अकोला येथील 'सूर नवा ध्यास नवा' फेम गोपाल गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या विठ्ठलभक्तीपर रचनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हरिनामाच्या अखंड गजरात शेकडो भाविक भक्तिरसात तल्लीन झाले. त्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT