नांदेड ः नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दाखल झालेले 8 उमेदवारांचे एकूण 17 अर्ज मंगळवारी झालेल्या छाननीत वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 जून असल्याने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.
नांदेडच्या राजकीय वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असे संकेत असले तरी 4 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
सोमवार, 1 जूनपर्यंत महायुतीच्यावतीने भाजपचे अमरनाथ राजूरकर, काँग्रेसचे रामदास पाटील, यांच्यासह ज्योतिबा खराटे, प्रवीण पाील चिखलीकर, कृष्णा नागेश पाटील (अपक्ष), प्रवीण पाटील चिखलीकर, माधवराव निवृत्तीराव पवार, पंकज गायकवाड, प्रशांत इंगोले या आठ उमेदवारांनी एकूण 17 अर्ज दाखल केले होते. यापैकी अमरनाथ राजूरकर आणि रामदास पाटील या दोघांनीही नामनिर्देशनपत्रांसोबत आपापल्या पक्षाचा एबी फॉर्म दाखल केला आहे.
मंगळवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात सर्व 17 अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.