उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या रविवारी नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचे स्वागत केले होते. pudhari photo
नांदेड

Ajit Pawar last Nanded visit : शेवटच्या नांदेड दौऱ्यात अजित पवारांचा दिलखुलास संवाद !

आठवड्याच्या आत या नेत्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर नांदेडमधील त्यांच्या हितचिंतकांना धक्का

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या दीड वर्षात सहा-सातदा नांदेड जिल्ह्यात आले. गेल्या रविवारी (दि.25) ते एका धार्मिक सोहळ्यासाठी येथे आले होते. हा त्यांचा शेवटचा नांदेड दौरा ठरला. या दौऱ्यात त्यांनी आजी-माजी आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांशी दिलखुलास संवाद साधला. त्यांनी एका राजकीय विषयावर स्थानिक पदाधिकाऱ्यांना आश्वासनही दिले; पण त्यानंतर आठवड्याच्या आत या आश्वासक नेत्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर नांदेडमधील त्यांच्या हितचिंतकांना धक्काच बसला.

बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पवार यांच्यासंबंधी एक दुःखद घटना कळाल्यावर त्यांची मर्जी संपादन केलेले आ.प्रताप पाटील चिखलीकर तसेच माजी आमदार सुभाष साबणे, मोहन हंबर्डे, ‌‘राष्ट्रवादी‌’चे जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर, प्रदेश चिटणीस वसंत सुगावे यांच्यासह अनेकजणं बारामतीकडे रवाना झाले. लाडक्या नेत्याच्या अपघाती निधनामुळे या साऱ्यांना शोक अनावर झाला. प्रतापराव तर ओक्साबोक्सी रडताना दिसले.

अजित पवार गेल्या 25 वर्षांत नांदेडला वेगवेगळ्या निमित्ताने आले. प्रमुख नेत्यांशी त्यांचा चांगला परिचय होताच; पण ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्यांस ते नावानिशी ओळखत. सुगावेंना ते ‌‘अरे वसंता‌’ म्हणत. रविवारच्या दौऱ्यात महानगर कार्याध्यक्ष माधव पावडे यांनी एका प्रलंबित राजकीय विषयाची त्यांना आठवण दिली, तेव्हा त्यांना ‌‘हो साहेब, हो साहेब...‌’ म्हणत पवारांनी आपल्या मिश्किल पैलूंचे दर्शन घडविले.

श्री गुरू तेग बहादूर यांच्या बलिदानास 350 वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ येथे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार होते. या पार्श्वभूमीवर पवार यांनी गेल्या शनिवारी नांदेड दौरा आखला; पण नंतर शहा यांचा दौरा रद्द झाल्यामुळे पवारही आपला दौरा रद्द करण्याच्या विचारात होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना नांदेडला येण्याची सूचना दिल्यानंतर ते रविवारी दुपारी नांदेडमध्ये दाखल झाले. काही काळ विमानतळावर थांबल्यावर ते नंतर शासकीय विश्रामगृहामध्ये आले. त्यांनी तेथे तासभर स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत वेळ घालविला.

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला अहिल्यानगर वगळता कोठेही चमक दाखवता आली नाही; पण नांदेडच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह चेतवण्यासाठी आपण पक्षाच्या विस्तारासाठी काम सुरू केले पाहिजे, असा मनोदय पवार यांनी व्यक्त केला.

निवडणुकांतील पैशांच्या अतिरेकी वापरावर त्यांनी चिंता व्यक्त केली. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी नांदेड मनपाचे उत्पन्न आणि आर्थिक स्थितीबद्दल विचारणा केली; पण समाधानकारक माहिती मिळाली नाही म्हणून त्यांनी थेट आयुक्तांशी संपर्क साधत मनपाचा ताळेबंद जाणून घेतला. साखर कारखाने, उसाचा उतारा, दर इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केल्याचे होटाळकर यांनी सांगितले.

कानावरील फोडावर इलाज

अजित पवार विश्रामगृहात बसलेले असताना कानावर एक बारीक फोड झाल्याचे त्यांना जाणवल्यानंतर बाहेर थांबलेल्या डॉक्टरांच्या पथकास पाचारण केले गेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी फोड नष्ट करून मलम लावले. या झटपट उपचाराबद्दल पवार यांनी डॉक्टरांचे आभार मानले.

शब्द पाळणार, पाळणार !

विश्रामगृहामध्ये मोहन हंबर्डे आणि सुभाष साबणे यांनी आ.प्रताप पाटील चिखलीकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी भावना अजित पवार यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर मी तसा शब्द दिला आहे, तो पाळणार म्हणजे पाळणार, अशा शब्दांत त्यांनी सर्वांना आश्वस्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT