1 crore Aid to Martyr Sachin Vananjay Family
नांदेड : सीमाभागात कर्तव्यावर असलेले जवान सचिन यादवराव वनंजे यांचे श्रीनगर परिसरात वाहन दरीत कोसळून अपघाती मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ६) दुपारी १ च्या सुमारास घडली होती. त्यांच्या कुटुंबियांना १ कोटीचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी आज (दि.१२) केली. त्याचबरोबर रमाई घरकुल देण्यासंबंधी अधिका-यांना सुचना देण्यात आल्या.
यावेळी वनंजे यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन पवार यांनी दिले. ते बा-हाळी येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित पक्ष प्रवेश मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर होते.
ते म्हणाले की, लाडक्या बहिणींसाठी वर्षाला ४५ हजार कोटी शासन खर्च करीत आहे. ही योजना बंद होणार नाही. आम्ही काही बँकांशी चर्चा केली असून लाडक्या बहिणीला व्यवसायासाठी ४०-५० हजार रूपये कर्ज देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ३९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लेडी धरणाच्या गळभरणीस प्रारंभ झाला आहे. प्रकल्पग्रस्तांचे मुलभूत प्रश्न सोडवले जातील.
नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपला पक्ष वाढवत असताना सर्वाचा योग्य सन्मान राखला जाईल. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उद्योग पर्यटन राज्यमंञी इंद्रनिल नाईक यांनी माझा या तालुक्याशी जवळचा संबंध असून भविष्यात या भागाच्या विकासासाठी मी सहकार्य करेन, असे आश्वासन दिले.
प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुखेड व कंधार तालुक्यात मोठा उद्योग उभा करण्याची मागणी केली.
अविनाश घाटे यांनी बोधन लातुर रोड या रेल्वे मार्गांची फार जुनी मागणी असून ती पूर्ण झाल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी काँग्रेस नेते शेषेराव चव्हाण, माजी सभापती सुशांत चव्हाण, काँग्रेसचे दिलीप कोडगीरे, जाहीरे, किशनराव राठोड यांचे नातू सदस्य संतोष राठोड, गणपत गायकवाड, प्राचार्य मनोहर तोटरे, सदस्य भंगारे आदीसह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेषेराव चव्हाण यांनी केले. तर निखील चव्हाण यांनी आभार मानले. माजी समाज कल्याण सभापती स्वप्निल चव्हाण, सुशांत चव्हाण, जि.प. च्या माजी अध्यक्षा वैशाली चव्हाण, तेजस चव्हाण, अमोल चव्हाण आदीसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.