Accident File Photo
नांदेड

Nanded News: नायगाव–उमरी रस्त्यावरील ढिगाऱ्याने घेतला युवकाचा बळी! नातेवाईकांचा संताप, चौकशीची मागणी

नायगाव ते उमरी रस्त्याच्या कामादरम्यान इकळीमाळ गावाजवळ रस्त्यावर टाकण्यात आलेल्या माती, मुरूम व गिट्टीच्या ढिगाऱ्यामुळे झालेल्या अपघातात ३३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Nanded News

नायगाव : नायगाव ते उमरी रस्त्याच्या कामादरम्यान इकळीमाळ गावाजवळ रस्त्यावर टाकण्यात आलेल्या माती, मुरूम व गिट्टीच्या ढिगाऱ्यामुळे झालेल्या अपघातात ३३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २०) रात्री घडली.

परमेश्वर बाबुराव जोंधळे, रा. इकळी (माळ), ता. नायगाव असे मृत युवकाचे नाव असून, रस्ते कामातील निष्काळजीपणामुळे त्याचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी पुन्हा एकदा केला आहे. परमेश्वर जोंधळे हे दुचाकीवरून घरी जात असताना २० नोव्हेंबरच्या रात्री सव्वा नऊच्या सुमारास रस्त्याच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या ढिगाऱ्यावर त्याची दुचाकी आदळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने इकळीमाळ गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने इकळीमाळ गावासह परिसरात संताप व्यक्त होत आहे. संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या युवकाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा व्यवस्था, धोक्याचे फलक, रात्रीच्या वेळी सूचना देणारे दिवे तसेच अडथळ्यांची योग्य मांडणी करणे अपेक्षित असते. मात्र, या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

याच ठिकाणी यापूर्वीही किरकोळ अपघात झाल्याच्या घटना घडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यातून कोणताही बोध घेतला जात नसल्याने परमेश्वर जोंधळे याच्यावर जीव गमावण्याची वेळ आली. रस्त्याचे काम करणाऱ्या यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे वारंवार अपघात होत असतील आणि त्यातून निष्पाप नागरिकांचे जीव जात असतील, तर अशा कामाच्या पद्धतीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

परमेश्वर जोंधळे याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची जबाबदारी निश्चित करावी, तसेच रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित यंत्रणेवर कारवाई करावी, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

रस्त्याचे काम की मृत्यूचा सापळा?

रस्त्याचे काम सुरू असताना माती, मुरूम आणि गिट्टीचे ढिगारे रस्त्यावर टाकून ठेवले जातात. मात्र, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दिसण्यासाठी धोक्याचे फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स आणि प्रकाश व्यवस्था असणे आवश्यक आहे. या मूलभूत सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष झाल्यास रस्ते अपघातांना निमंत्रण मिळत असून, निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. संबंधित विभागाने आता तरी जागे होऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT