Nanded News : ८२८ समाजकंठकांना गावात येण्यास बंदी file photo
नांदेड

Nanded News : ८२८ समाजकंठकांना गावात येण्यास बंदी

नांदेड: 'श्री 'विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांचा कडक पवित्रा

पुढारी वृत्तसेवा

828 anti-social elements banned from entering the village

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : आगामी गणेश विसर्जन मिरवणुका सर्वत्र शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध अत्यंत कडक पवित्रा घेतला आहे. सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या तब्बल ८२८ समाजकंटकांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात आला असून, त्यांना उत्सव काळात गावात थांबण्यास थेट मनाई करण्यात आली आहे.

नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात '२+ स्कीम' (दोन किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईतांची स्वतंत्र यादी) प्रभावीपणे राबवली जात आहे. २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर, गृह विभागाच्या आदेशान्वये प्राप्त विशेषाधिकारांचा वापर करत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकूण ८२८ इसमांविरुद्ध कलम १६३ अन्वये मनाई आदेश पारित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नांदेड विभागातील ४६८ आणि भोकर विभागातील ३६० समाजकंटकांचा समावेश आहे.

यात कारवाई केलेल्या प्रमुख पोलीस ठाण्यातील नायगाव : २२, शिवाजीनगर : ७४, इतवारा : ५५, सिंदखेड व कुंडलवाड पोलिस ठाण्यातील प्रत्येकी ५२, भाग्यनगर, नांदेड ग्रामीण व हदगाव पोलिस ठाण्यातील प्रत्येकी ५०, अर्धापूर : ४०, याशिवाय वजिराबाद (३५), रामतीर्थ (३३), किनवट (३२), उमरी (२९), देगलूर (२५), माहूर व मरखेल (प्रत्येकी २०), मुदखेड व उस्माननगर (प्रत्येकी १६), कुटूर (१५), इस्लापूर व लिंबगाव (प्रत्येकी १०) आणि मुखेड (०९) या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही सराई गुन्हेगारांना मनाई हुकूम जारी करण्यात आले आहेत.

उल्लंघन केल्यास तुरुंगाची हवा

गावात अवैध दारू विक्री, जुगार अथवा इतर अवैध धंद्यांतून वाद घालणारे, मारहाण व दहशत निर्माण करणारे घटक, तसेच मिरवणूक मार्गावर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा पूर्वेतिहास असलेल्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींविरुद्ध हे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत, त्यांनी विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी संबंधित गावात किंवा मिरवणूक परिसरात प्रवेश करू नये अथवा थांबू नये. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) व महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT