75 percent sowing completed by the end of June
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : दरव-र्षीप्रमाणे या वर्षिही पावसाचा लहरीपणा कायम आहे. परंतु, तरीही अर्द्राच्या नुकत्याच झालेल्या पावसानंतर पेरण्यांचा वेग वाढला. जून अखेर ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक तेलबियांची पेरणी ७५.६५ टक्के, कापूस ७६ टक्के, तर कडधान्य ५० टक्क्यांवर पेरले गेले.
अर्दाचा पहिला आठवडा उलटल्यानंतरसुद्धा पान्सूनच्या पावसाला नियमित सुरुवात झालेली नाही. ढगाळ वातावरणामुळे दररेज पावसाची शक्यता वर्तवली जाते. परंतु, दिवसामागून दिवस कोरडे जात आहेत. मागील आठवड्यात पाच तालुके वगळता सर्वदूर जोरदार पाऊस झाला. ३९ महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. एकाच रात्री ६० मिमी पाऊस झाला. परंतु, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील सहा दिवसांपासून कुठे-कुठे तुरळक २-३ मिमी पाऊस पडतो आहे.
किमान १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेतला. अजूनही मुखेडसह पाच तालुक्यामध्ये १०० मिलिमीटर पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्या भागातील पेरण्या रखडल्या आहेत.
२७ जूनपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार २६.६२ टक्के क्षेत्रावर तृणधान्याची पेरणी झाली. तर ५५.८० टक्के क्षेत्रावर कडधान्याची पेरणी झाली आहे. तर ७५.७० टक्के क्षेत्रावर गळीतधान्य पेरले गेले. नांदेड जिल्ह्यात तृणधान्यापैकी सर्वाधिक २४ हजार १५१ हेक्टर क्षेत्र ज्वारीचे असून पैकी केवळ चार हजार ४९५ हेक्टर अर्थात केवळ १८.६१ टक्के पेरणी झाली आहे. भात, बाजरी, मका व अन्य तृणधान्याचे क्षेत्र अगदीच किरकोळ आहे.
कडधान्यात ७० हजार २२२ हेक्टरवर तुरीचे क्षेत्र आहे. मुग व उडीद सामान्यपणे २२ हजार हेक्टरवर पेरले जाते. परंतु, आजवर सरासरी ५० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबियांपैकी सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख ४२ हेक्टर असून तीन लाख १६ हजार ४५५ हेक्टरवर अर्थात ७५.७० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
अद्याप नियमित पावसाला सुरुवात झाली नसली तरी, पेरण्या आटोपण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. नांदेड जिल्ह्यात कापूस हे एक प्रमुख नगदी पीक असून २ लाख एक हजार ४६१ हेक्टरवर कापसाची पेरणी केली जाते. पण अद्याप एक लाख ५३ हजार १४५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. हवामानशास्त्र केंद्राच्या अंदाजानुसार येत्या एक-दोन दिवसात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्याच्या पावसाचा इतिहास पाहता १५ जुलैनंतर खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होते.