34 e-buses inducted into Nanded depot fleet
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : डिझेलच्या वाढत्या खर्चातून मुक्ती आणि पर्यावरणाचे संरक्षण या दुहेरी उद्देशाने एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस (ई-बसेस) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जून २०२५ पासून आतापर्यंत नांदेड आगारात एकूण ३४ ई-बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे नांदेडमधील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि पूर्णपणे प्रदूषणुक्त बनला आहे.
नव्या ई-बसेसमुळे लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोलापूर, बीड, उमरगा, यवतमाळ, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, हिंगोली, देगलूर आदी मागाँवर इलेक्ट्रिक बसेस धावू लागल्याने प्रवाशांना सुखदायी प्रवास मिळू लागला आहे. उमरगा आणि हिंगोली आगाराच्या सहा बसेस धावत आहेत.
तसेच नांदेड आगाराच्या वतीने लातूर (४), सोलापूर (४), बीड (४) यवतमाळ (५) आणि अमरावती (१), हिंगोली (६), देगलूर (४), उमरगा (६) आदीप्रमाणे बसेस सोडण्यात येत आहेत.
प्रवाशांना मिळतात सुविधा ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुविधा, महिलांसाठी अर्ध्या किमतीची सवलत उपलब्ध आहे. सुखकर प्रवासासाठी इलेक्ट्रिक बसमधून प्रवाशांनी प्रवास करावा.- डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभाग नियंत्रक नांदेड.
अजून २०० बसेसचा प्रस्ताव
सध्या केवळ नांदेड आगारातच चार्जिंगची सोय आहे. मात्र, किनवट, मुदखेड, देगलूर, कंधार, हदगाव, बिलोली व माहूर या सात आगारात चार्जिंग पाइंट बसविणे सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर आठही आगारांतून इलेक्ट्रिक बसेस धावताना दिसतील. तसेच नांदेड जिल्ह्याकरिता अजून २०० इलेक्ट्रिक बसेसचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.