नांदेड : जिल्हा बँक निवडणूक प्रकरणात 21 याचिका दाखल! pudhari photo
नांदेड

Nanded DCC Bank election|नांदेड : जिल्हा बँक निवडणूक प्रकरणात 21 याचिका दाखल!

छ. संभाजीनगर खंडपीठात मंगळवारी होणार सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी विभागीय सह निबंधकांनी गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीतील वेगवेगळ्या नावांविरोधात उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर खंडपीठात तब्बल 21 याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर येत्या मंगळवारी (दि.9) सुनावणी होणार आहे.

बँकेच्या निवडणुकीसंदर्भातील सहकार विभागाकडील प्रक्रिया गेल्या महिन्यात 29 तारखेला पूर्ण झाली. या विभागाने आधी प्रारूप मतदार यादी जाहीर केली. त्यात असलेल्या अनेक नावांवर हरकत घेण्यात आली, तर काही सभासद पात्र असूनही त्यांची नावे वरील यादीत आली नाहीत. अशांनीही आक्षेप नोंदविला होता.

निर्धारित मुदतीत तब्बल 129 आक्षेप दाखल झाले. त्या प्रत्येक आक्षेपावर तत्कालीन विभागीय सह निबंधकांनी सुनावणी ठेवली. नंतर प्रत्येक प्रकरणावर निर्णय देऊन 29 मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

त्यानंतरच्या आठवडाभरात 21 प्रकरणे खंडपीठात गेली आहेत, असे येथे सांगण्यात आले. बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. तत्पूर्वी दाखल झालेल्या वेगवेगळ्या याचिका एकाच पीठासमोर पुढील कार्यवाहीसाठी ठेवण्यात येतील. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीसाठी सर्व संबंधितांना हजर राहण्यास सांगण्यात आले असून बँक प्रशासनाने आपल्या विधिज्ञांना त्याबद्दल सूचना दिली आहे.

विभागीय सह निबंधकांकडे काही थकबाकीदार सेवा सहकारी संस्थांतर्फे मतदार प्रतिनिधी म्हणून आलेल्या नावांना आक्षेप घेण्यात आला होता; परंतु असे बरेच आक्षेप त्यांनी फेटाळून लावल्यामुळे अनेक थकबाकीदार संस्थांच्या प्रतिनिधींना दिलासा मिळाला. अशा प्रकरणातील आक्षेपकर्त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांनी खंडपीठामध्ये धाव घेतली.

  • उमरी तालुक्यातील प्रमुख नेते मारोतराव कवळे यांचे नाव सिंधी सेवा सहकारी सोसायटीतर्फे बँकेच्या मतदार यादीत आले. तत्पूर्वी या संस्थेने थकबाकीची व्याजासकट रक्कम ज्या पद्धतीने भरली त्यास आक्षेप विरोधी गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता. हा गट प्रबळ असूनही विभागीय सह निबंधकांनी त्यांचे म्हणणे फेटाळून लावत मारोतराव कवळे यांचे नाव यादीमध्ये कायम ठेवले. खंडपीठात दाखल झालेल्या याचिकांमध्ये कवळे यांच्या विरुद्धची याचिका सर्वांत लक्ष्यवेधी मानली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT