मराठवाडा

नांदेड : ५० लाखांची खंडणी मागणारे तिघे जेरबंद

Shambhuraj Pachindre

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : ५० लाख रूपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ही घटना सोनखेड पोलीस ठाणे क्षेत्रातील ढाकणी येथे गुरूवारी (दि. २९) सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान घडली.

ढाकणी येथे असलेल्या गिट्टी क्रेशर मालकाकडे तीन आरोपींनी ५० लाख रूपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास गोळीने उडवून देण्याची धमकी देण्यात येत होती. मागील एक महिन्यांपासून खंडणीसाठी आरोपींचा पाठपुरावा सुरू होता. गुरूवारी क्रेशर मालकाने पैसे देण्याचे कबूल केल्यानंतर तीन आरोपी दुचाकीवरून ढाकणी येथे आले होते. परंतु, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली.

यादरम्यान काही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी गोळीबार केला असल्याची माहिती आहे. घटनास्थळी गुरूवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखाचे पो.नि.द्वारकादास चिखलीकर, सोनखेडचे स.पो.नि. विशाल भोसले यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

यासंदर्भात पोलिसांकडून अधिकृत माहिती दिली जात नसली तरी संपूर्ण तपासानंतर माहिती दिली जाईल. असे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. आरोपींनी खंडणी मागताना कुख्यात दहशतवादी 'हरविंदरसिंघ रिंदा' याचे नाव घेतले असल्याचे समजते.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT