हदगाव: पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणसंदर्भात दत्ता पाटील हडसणीकर हा युवक मागील पंधरा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसला आहे. त्याची प्रकृती गंभीर बनत चाचली आहे. या संदर्भात विधिमंडळात काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्यांचे उपोषण सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्के आतील घटनात्मक आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील मौजे हडसणी येथील दत्ता पाटील हडसानीकर हा युवक मागील पंधरा दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहे. त्याच्या उपोषणाला विविध सामाजिक संघटनांनी व ग्राम पंचायतीने पाठिंबा दर्शविला आहे. तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवस हदगाव तालुका बंदची हाक देण्यात आली होती. त्यास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
अशोकराव चव्हाण यांनी भ्रमणध्वनीद्रारे संपर्क साधून दत्ता पाटील यांच्याशी चर्चा केली. सरकारने आश्र्वासित केल्यानंतर आपण उपोषण सोडणार असे त्यांने सांगितले. तेव्हा चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेत सरकारने आपला एक प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवून त्यांचे उपोषण सोडवावे, अशी विनंती केली.
हेही वाचा