मराठवाडा

fraud : ॲप डाउनलोड करण्याच्या बहाण्याने प्राध्यापकास गंडवले

अविनाश सुतार

केज (बीड), पुढारी वृत्तसेवा : केज येथे एका निनावी फोनवरून चक्क एका प्राध्यापकास १ लाख ४३ हजार रुपयांना गंडविल्याचा ( fraud ) प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रा. शकील तांबोळी (shakeel tamboli) यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज येथील समर्थनगर भागात राहत असलेले शकील बशीर तांबोळी पुणे येथील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान अनोळखी नंबर वरून एक फोन आला.

फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने प्रा. तांबोळी यांना सांगितले की, तुमची केवायसी सेवा चालू ठेवण्यासाठी प्ले स्टोअर्स मधून एक ॲप डाउनलोड करा. नंतर १० रुपयाचे रिचार्ज करा. त्यानंतर प्रा. शकील तांबोळी यांच्या बँक खात्यातून एकदा २५ हजार, दुसऱ्यांदा ४९ हजार ३५० आणि तिसऱ्या वेळी ६५ हजार असे एकूण १ लाख ३९ हजार ३६५ रुपयांची फसवणूक ( fraud ) झाली.

आपली फसवणूक ( fraud ) झाल्याचे निदर्शनास येताच प्रा. तांबोळी यांनी २१ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पुढील तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT