मराठवाडा

बीड : वर्दीतल्या अवलियाने नेकनूरच्या बाजाराला दिला ‘हिरवा शालू’

मोहन कारंडे

बीड, पुढारी वृत्तसेवा : लॉकडाऊनचा काळ ऑक्सीजनमुळे झाडांचे महत्त्व सांगणार होता. यातच नेकनुर बाजार बंद असल्याने पत्रकार व पोलीस अधिकाऱ्यांच्या ग्रुपने अनेकांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला मूर्त रूप देत बाजाराला तीन वर्षात सावली दिली. दीड वर्ष नेकनूरमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण व्यंकटराव केंद्रे यांच्या पुढाकारातून येथे अनेक झाडे लावण्यात आली. त्यामुळे आज या झाडांबरोबर केंद्रे या अधिकाऱ्यांचे नाव अलगदपणे सर्वांच्या तोंडात येते.

तीन वर्षांपूर्वी नेकनूर येथील आठवडे बाजारात एकही झाड नव्हते. मार्चमध्ये कोरोना आला त्यानंतर येथील पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून लक्ष्मण केंद्रे यांची या ठिकाणी बदली झाली. कोरोनाचा काळ होता काहीसा वेळ शिल्लक होता त्याचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीने लक्ष्मण केंद्रे यांनी येथील आठवडे बाजारात झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला व त्यावेळी त्यांना येथील मॉर्निंग ग्रुपने सहकार्य केले. येथील आठवडे बाजारात जांभूळ, वड, पिंपळ, उंबर यासारख्या देशी झाडांची लागवड करण्यात आली. गुलमोहराचीही काही झाडे लावण्यात आली.

एका पोलीस अधिकाऱ्याच्या विचारातून एकत्र आलेला मॉर्निंग ग्रुप लॉकडाऊनच्या काळात परिसरात चर्चेचा विषय ठरला होता. केंद्रे यांनी आपल्या कर्तव्या सोबतच पर्यावरणावरील प्रेमापोटी वृक्षरोपणाची चळवळ उभा केली. यामध्ये अनेकजण त्यांना योगदान देत होता. त्यांच्या बदलीनंतर या ग्रुपने ही झाडे जगवली. सध्या बाजाराला मोठी सावली उपलब्ध झाली आहे. झाडांच्या सावलीचा आधार अनेकांना होत आहे. बाजारासाठी आलेल्या नागरिकांना ही सावली झाडांचे महत्त्व सांगून जाते. पक्षांचा किलबिलाटही बाजारात होऊ लागला आहे.

लक्ष्मण केंद्रे यांच्यासह गावकरी, ग्रामपंचायत व मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मनोज गव्हाणे, सुरेश रोकडे, वनपाल अच्युतराव तोंडे, तुळजीराम शिंदे, अशोक शिंदे, रामनाथ घोडके, सचिन डिडूळ, अमोल नवले, विकास नाईकवाडे, उद्धव नाईकवाडे, किशोर चव्हाण, सुनील शिंदे, महादेव काळे, वैभव कोळेकर या सर्वांनी प्रयत्न करून येथील झाडांची लागवड केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT