चाकूर : तालुक्यातील शेळगाव येथील तिरू नदीत सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.२४) सायंकाळी ४ वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा असून याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
चाकूर ते वाढवणा रस्त्यावरील शेळगाव गावाच्या जवळील तिरू नदीत रस्त्यावरील पुलावरून एका सुटकेसमधून अज्ञात महिलेचा मृतदेह झाडीत फेकून देण्यात आला. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास या भागातील शेतकऱ्यांना उग्रवास येत असल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान वाढवणा पोलिस ठाण्याचे पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, चाकूरचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली असता सुटकेसमध्ये २५ ते ३० वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला. जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह आणखी एक पोलिसांचे पथक सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चापोली येथील आरोग्य केंद्रात पाठविला. ही महिला कोण? आणि तिचा खून का करण्यात आला? याचा पोलिसांकडून विविध मार्गाने शोध सुरू आहे.