Chakur Water Crisis pudhari photo
लातूर

Chakur Water Crisis : चाकूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा

सात गावांत बोअर अधिग्रहण; बोथी तलावातील पाणीपातळी घटली, 48 टक्के पाणीसाठा

पुढारी वृत्तसेवा

संग्राम वाघमारे

चाकूर : तालुक्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सद्यः स्थितीत चाकूर तालुक्यात पाच गावे व दोन वाड्यांना बोअर अधिग्रहणच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. चाकूर व बोथी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोथी तलावातील पाणी पातळी दिवसेंदिवस बाष्पीभवनामुळे घटत चालली असून सद्या तलावात 48 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तालुक्यात या बोअरच्या माध्यमातून नागेशवाडी, नांदगाव, अजनसोंडा खु., सेवापुर तांडा, केंद्रेवाडी, आंबेवाडी आणि अंबुलगा या गावाची तहान भागवली जात आहे. मे महिन्यात हिटमुळे तापमानात तीव्र वाढ झाली आहे. सध्या चढउतार पाहायला मिळत असून तालुक्यात 42 अंश तापमानाची नोंद झाली आहे. या वाढलेल्या उन्हामुळे ग्रामीण भागातील जलसाठ्यामधील पाणी झपाट्याने कमी झाले आहे.

विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोत आटत चालले आहे.यामुळे नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या पाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून तालुका प्रशासनाने पाच गावांसह दोन वाड्यांवर अधिग्रहण प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील काही दिवसात उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे नैसर्गिक जलश्रोतांमधील पाणी बाष्पीभवनामुळे कमी होणार असून ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.चौकट : पाण्याची स्थिती पाहता यावर्षी बोथी तलाव हा 100 टक्के पूर्णपणे भरला होता. उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊन जलसाठा 48 टक्के राहिला. वेळीच नगरपंचायत प्रशासनाने बोथी तलावावरील मोटारी बंद केल्या असून आजूबाजूच्या डी. पी वरील वीज कनेक्शन काढले आहेत.

सद्यस्थितीत पाणी 48 टक्के शिल्लक असून चाकूर शहराला दररोज 15 लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो तर बोथी गावाला दररोज 2 लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.चाकूर आणि बोथी गावातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT