Vilasrao Deshmukh's dream of writing an autobiography did not come true.
लातूर, शहाजी पवार
राजकीय जीवनाच्या वाटचालीत अनेक माणसे भेटली. तत्त्वाशी तडजोड न करता घडलेल्या या माणसांकडून मला खूप काही शिकता आलं. पुढे-पुढे तर यातील बरेच जण माझ्या श्रद्धा अन प्रेरणेचा विषय झाली. आजही ते क्षण आठवले की मन भरून येत. त्यांचं हे वेगळेपण सर्वांना सांगावं अशी अंतर्मनातून हाक येते, त्या हाकेला प्रमाण मानूनच मी मनी असलेल्या या आठवणींना ग्रंथरूप देणार आहे, होय मी आत्मचरित्र लिहिणार आहे. 15 फेब्रुवारी 2009 च्या विलासरावजींच्या या वक्तव्याने तमाम लातूरकर व त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता, मात्र नियतीने हा सुखद क्षण प्रत्यक्षात येऊ दिला नाही.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे नातू मदन पाटील यांच्या उपस्थितीत लातूरच्या केशर आंबा व डाळिंब निर्यात केंद्राचे उद्घाटन झाले होते. त्यावेळी विलासरावांच्या मनात वसंतदादांच्या आठवणी दाटल्या होत्या. तेव्हा त्यांनी हा मनोदय व्यक्त केला होता.
विलासराव म्हणाले, राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील दादांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही. माणसे कशी जोडावीत? याचा वस्तूपाठ मला दादांनी दिला. सहकार क्षेत्रातील मानदंड ठरलेला मांजरा ही दादांचीच प्रेरणा. शंकरराव चव्हाण हे तर गुरु. बाबासाहेब भोसले, सुधाकरराव नाईक यांच्याकडून ही प्रेरणा मिळाली. लोकप्रिय निर्णय कसे घ्यावेत?, ते शरद पवारजींकडून शिकलो. अशी अनेक माणसं मला भेटली आणि मी घडत गेलो. त्यांचे हे मोठेपण सर्वांना कळले पाहिजे असं मला वाटत आहे.
ते पुस्तकाच्या रूपात साकारले तर येणाऱ्या पिढ्यांसाठी तो प्रेरणास्त्रोत होईल असं माझं मन मला सांगत आहे, त्याचा आराखडा मी बांधला असून लवकरच मी शब्दरुप देणार आहे असे ते म्हणाले. त्यांचे शब्दसोष्ठव, राजकारण अन समाजकारणातला प्रर्दीर्घ वावर, विलक्षण लोकसंग्रह, वाचन, माती आणि माणसांशी त्यांनी जपलेले अतूट नाते यामुळे ते रचनेला न्याय देतील यावर लातूरकरांचा विश्वास होता मात्र ते नियतीला मान्य नव्हता.