बाभळगावच्या मातीत ड्रॅगन फ्रुट, टरबुजाचा यशस्वी प्रयोग  pudhari photo
लातूर

Babhalgaon organic farming : बाभळगावच्या मातीत ड्रॅगन फ्रुट, टरबुजाचा यशस्वी प्रयोग

वैशालीताई देशमुखांनी फुलवली सेंद्रिय शेती; सासू-सुनांचा जिव्हाळ्याचा व्हिडिओ व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

लातूर : सत्ता आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या बाभळगावच्या मातीत आता सेंद्रिय शेतीचा नवा सुगंध दरवळू लागला आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख यांनी आपल्या जिद्द आणि दूरदृष्टीच्या जोरावर शेतीमध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कष्टाचे कौतुक खुद्द त्यांच्या सून दीपशिखा धीरज देशमुख यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत केले आहे.

वैशालीताई देशमुख यांनी बाभळगाव येथील शेतात आधुनिक पद्धतीने सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. रसायनांचा कोणताही वापर न करता पिकवलेले ड्रॅगन फ्रुट आणि टरबूज आज भरघोस उत्पादन देत आहेत. केवळ उत्पादनच नाही, तर आरोग्यासाठी पूरक असलेल्या या सेंद्रिय उत्पादनांनी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दीपशिखा देशमुख यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शेतीचा हिरवागार परिसर आणि वैशालीताईंचे कष्ट स्पष्टपणे दिसत आहेत. हा व्हिडिओ केवळ शेतीची माहिती देणारा नसून, तो सासु-सुनामधील प्रेम, जिव्हाळा आणि परस्परांप्रती असलेल्या आदराचा एक सुंदर पुरावा ठरला आहे.

मोठ्या आणि प्रतिष्ठित कुटुंबात असूनही मातीशी असलेले हे घट्ट नाते नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. हा प्रयोग केवळ बाभळगावसाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरणार आहे.

माझ्या आईसमान सासूबाई अतिशय उत्तम आणि कष्टाने शेती करत आहेत. त्यांच्या या कार्यातून अनेक महिलांना आणि तरुण पिढीला प्रेरणा मिळत आहे. शेतीकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन त्यांनी समाजासमोर ठेवला आहे.
दीपशिखा देशमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT