Unseasonal rain : रत्नापूर, येरमाळा परिसरात अवकाळी पावसाचा कहर file photo
लातूर

Unseasonal rain : रत्नापूर, येरमाळा परिसरात अवकाळी पावसाचा कहर

गावासह परिसरात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः कहर केला असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Unseasonal rains wreak havoc in Ratnapur, Yermala areas

रत्नापूर, पुढारी वृत्तसेवा : गावासह परिसरात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः कहर केला असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसात गारांचा तडाखा बसल्याने गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या प्रमुख पिकांसह आंबा, टरबूज, केळी आणि कांदा या नगदी पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.

सध्या हरभरा आणि गव्हाची काढणी सुरू असताना अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी काढणीसाठी तयार असलेले पीक भिजल्याने त्याची गुणवत्ता घसरली असून उत्पादनावरही मोठा परिणाम होणार आहे.

काही शेतकऱ्यांचे काढलेले पीक शेतातच भिजून खराब झाले. यंदा आधीपासूनच ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या झाडांवरील मोहर गळून पडत होता. त्यातच आज झालेल्या गारपिटीने उरलेसुरले आंबेही झाडावरून खाली पडले असून फळबागांना मोठा फटका बसला आहे.

टरबूज आणि केळी या पिकांनाही गारांच्या मारामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. अनेक शेतकरी हताश झाले असून शासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून पुढील काही दिवस हवामान कसे राहणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT