

Kharif crop lost due to heavy rains; Rabi crop also affected by rains
सोयगाव, पुढारी वृत्तसेवा : मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सोयगाव परिसरातील खरीप पिके पूर्णतः हातून गेली आहेत. आता रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पुन्हा झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणखी वाढले आहे.
कांदा, गहू, ज्वारी, मका, नागवेली पानमळा तसेच भाजीपाल्याच्या पिकात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. अतिवृष्टीमुळे कापसाच्या अक्षरशः वाती झाल्या असून सोयाबीन व मक्याच्या घुगऱ्या कुजल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
तातडीने आर्थिक मदत मिळावी, पीक नुकसानीचा पंचनामा करून योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी सोयगाव परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे गणित बिघडवले आहे. नुकत्याच झालेल्या पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना थोडीफार मदतीची आशा निर्माण झाली होती; मात्र पुन्हा दमट व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा, तुडतुडे व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पाणी साचलेले असून त्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. तुरीच्या फुलांवर काळा मावा बसल्याने फुले गळत असून शेतकऱ्यांचे मनोबल खचले आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिके लावली असतानाच या पावसाने त्यांच्या आर्थिक संकटात आणखी भर टाकली आहे. अनेकांचे पंचनामे पूर्ण झाले असले तरी नुकसानभरपाईची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नसल्याने शेतकरी सरकारकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत आहेत.
कृषी विभागाकडून निरीक्षणाचे दौरे सुरू असून शेतकऱ्यांना फवारणी करून पिके वाचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, शेतात चिखल आणि पाणी साचल्याने अनेकांना फवारणी करणेही कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, आधीच कर्जबाजारी आहोत, त्यात आता फवारणीसाठी आणखी खर्च करणे परवडत नाही. सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून ती थेट खात्यात जमा करावी. परतीच्या पावसामुळे कापसाच्या बोंडात पाणी शिरले असून तुरीचे पीकही माव्याच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात आले आहे.
विकावे की सडू द्यावे या व्दिधा मनःस्थितीत
व्यापारी ओल्या कापसाचे भाव प्रतिक्विटल सहा हजार रुपयांपर्यंत मागत आहेत, तर सोयाबीनला साडेतीन ते चार हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी 'विकावे की सडू द्यावे' या द्विधा मनःस्थितीत आहे. अनेक ठिकाणी मक्याचे उभे पीकही पाण्याखाली गेले असून कुजण्यास सुरुवात झाली आहे.