जावेद शेख
उदगीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब महिलांच्या डोळ्यातील धूर कमी करण्यासाठी सुरू केलेली महत्वाकांक्षी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना (PMUY) सध्या महाराष्ट्रात बंद असल्याने उदगीर तालुक्यातील हजारो पात्र लाडक्या बहिणी आजही धुरातच चुली फुंकत आहेत. केंद्र सरकारची ही योजना असून राज्यात नवीन कनेक्शन वाटप सध्या थांबल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे या लाभापासून वंचित राहिली आहेत.
यापूर्वी या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजना म्हणून समजण्यात येत होते, प्रत्यक्षात ही केंद्र सरकारची PM उज्ज्वला योजना आहे. राज्यात सध्या या योजनेअंतर्गत नवीन नोंदणी बंद असल्याने उदगीर तालुक्यातील अनेक गावांत महिला आजही पारंपरिक चुलीवर अवलंबून आहेत.
तालुक्यात काय परिस्थिती?
उदगीर तालुक्यातील तोंडार, लोणी, देवर्जन, हाकनवाडी, हाळी, नागलगाव, मलकापूर ,सोमनाथपुर,या ग्रामीण भागात शेकडो महिलांनी PM उज्ज्वला योजनेसाठी अर्ज केले होते. कागदपत्रे देऊन तहसील कार्यालय आणि गॅस एजन्सींचे उंबरठे झिजवले, मात्र कोटा संपला, पोर्टल बंद आहे, असे सांगून त्यांना परत पाठवले जात आहे.
ज्यांना पूर्वी कनेक्शन मिळाले आहे, त्यांनाही सिलिंडर रिफिलिंगचा मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ९००,ते १०००, रुपयांना सिलिंडर भरणे शेतमजूर आणि अल्पभूधारक कुटुंबातील लाडक्या बहिणींना परवडत नसल्याने अनेकांनी सिलिंडर कोपऱ्यात ठेवून पुन्हा लाकूड आणि शेणाच्या गोवऱ्यांवर स्वयंपाक सुरू केला आहे.
आरोग्यावर परिणाम सकाळी शेतात जाऊन लाकूड गोळा करायचे आणि दिवसभर धुरात डोळे चुरचुरत स्वयंपाक करायचा, यामुळे महिलांमध्ये डोळ्यांचे विकार, दमा, फुफ्फुसाचे आजार वाढल्याचे ग्रामीण आरोग्य केंद्रातील डॉक्टर सांगतात. महिलांची मागणी केंद्र सरकारने PM उज्वला योजना पुन्हा महाराष्ट्रात सुरू करावी. आम्हाला मोफत कनेक्शन द्यावे आणि सिलिंडरवर सबसिडी वाढवावी. लाडकी बहीण योजनेचे १५००, रुपये येतात, पण गॅसचे १०००, रुपये गेले तर हातात काय उरते?" असा सवाल ग्रामीण भागातील महिला करीत आहेत.
या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार, उदगीर यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवून PM उज्वला योजनेचा कोटा पुन्हा सुरू करून वंचित पात्र महिलांना लाभ द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नवीन उज्ज्वला कनेक्शन बंदच, जुने सुरू : तहसीलदार
PM उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या सद्यस्थितीबाबत तहसीलदार राम बोरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली. नवीन PM उज्ज्वला गॅस कनेक्शन सध्या बंद आहे का, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, नवीन कनेक्शन सध्या चालू नाहीत, फक्त जुनी कनेक्शन सुरू आहेत तसेच रेग्युलर गॅस कनेक्शनबाबत विचारणा केली असता गॅस एजन्सीधारकांनी सांगितले की, सध्या रेग्युलर गॅस कनेक्शनही बंद आहेत, फक्त नाव नोंदणी (रजिस्ट्रेशन) चालू आहे. या संपूर्ण प्रकरणात अधिकृत माहीती यासंदर्भात मला सेल्स ऑफिसर यांच्याशी बोलावे लागेल, याबाबत मला काहीच माहिती नाही.
नवीन कनेक्शनच नाही तर डबल सिलिंडरही बंद, फक्त रजिस्ट्रेशन सुरू PM उज्वला योजनेचे नवीन कनेक्शन तर बंद आहेतच, परंतु एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला नवीन रेग्युलर गॅस कनेक्शन घ्यायचे असेल किंवा सिंगलचे डबल सिलिंडरमध्ये रूपांतर करायचे असेल तर ती सुविधाही सध्या बंद आहे ,उदयगिरी गॅस एजन्सी, उदगीर