Drought Management pudhari photo
लातूर

Neelam Gorhe : सोमवारपर्यंत गावोगावी चारा उपलब्ध करा

डॉ. नीलम गोऱ्हे : शासन निर्णयानंतरही दुष्काळग्रस्त भागाची पाहणी नसल्याबद्दल खेद

पुढारी वृत्तसेवा

उदगीर : चाऱ्याची गरज असलेल्या गावांची तातडीने पाहणी करून सोमवार, दि. १२ ऑक्टोबरपर्यंत जनावरांसाठी गावातच चारा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिल्या. दुष्काळी उपाययोजनांबाबत २५ सप्टेंबर रोजी शासन निर्णय होऊनही गंभीर दुष्काळग्रस्त भागात आवश्यक पाहणी झालेली नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

मराठवाडा दौऱ्यात डॉ. गोऱ्हे यांनी उदगीर तालुक्यातील करडखेल, डिग्रज आणि सताळा परिसरातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतांच्या बांधावरजाऊन त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधत पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची स्थिती जाणून घेतली. ग्रामस्थांनी सुमारे दोन हजार जनावरांसाठी चाऱ्याची गरज व्यक्त केली.तलाठी, सरपंच आणि संबंधित यंत्रणांनी जनावरांची व मालकांची यादी तयार करून खातरजमा करावी. त्यानुसार चारा पुरवठ्याचे नियोजन करून सोमवारपर्यंत चारा पोहोचवावा, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

या प्रश्नावर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी, वीजबिलात सवलतआणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात दिलासा देण्याची मागणी केली. भूमिहीन शेतमजुरांना आर्थिक सहाय्य व रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, रोजगार हमीची कामे, पीककर्ज पुनर्गठन आणि आरोग्य-पोषणाच्या प्रश्नांवर पाठपुरावा करण्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. पाणीपुरवठ्याच्या पात्र कामांसाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयांपर्यंत मदत करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT