उदगीर : शहरातील किल्ला गल्ली परिसरात घरात घुसून मारहाण करत सोन्याचे दागिने व रोकड जबरदस्तीने घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मंगळवारी (१९ मे) रात्री आठच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नबी जलालसाव सय्यद (वय ५० वर्षे, रा.किल्ला गल्ली, शेरखा मोहल्ला, उदगीर) यांच्या फिर्यादीवरून कलम ११९(१), ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५१(२), ३५२ नुसार शकील मेहताब सय्यद, मेहताब सय्यद, साजिद मेहताब सय्यद, समीर मेहताब सय्यद, रिजवाना मेहताब सय्यद व अलीना साजिद सय्यद, (सर्व रा.बिदर रोड, उदगीर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १७ मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांच्या मुलीच्या अंगावरील सोन्याचे दागिने देण्याची मागणी केली. त्यावेळी फिर्यादींची मुलगी कपाटातून दागिने काढत असताना शकील मेहताब सय्यद याने कपाटातील दीड लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे. फिर्यादी यांनी विरोध केला असता आरोपीने दांडाविरहित कुऱ्हाडीच्या पात्याने त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच फिर्यादींच्या मुलांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली.
दरम्यान भांडण सोडवण्यासाठी आलेल्या माजीद जब्बारखान पठाण यांनाही कुऱ्हाडीच्या पात्याने मारहाण करण्यात आली. तर मुजफ्फर मुस्तफाखान पठाण यांना चाकूने जखमी करून त्यांच्या गळ्यातील अंदाजे १ लाख ९० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर आरोपींनी सर्वांना शिवीगाळ करत “खत्म करतो” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात कुऱ्हाडीचे पाते, चाकू व कुऱ्हाडीचा लाकडी दांडा यांचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करीत आहेत.