जावेद शेख
उदगीर : हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण असलेल्या दसरा , दिवाळीच्या तोंडावर गोरगरिबांच्या ताटातील आनंदच हरवल्याची संतप्त प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहे. यापूर्वी दरवर्षी दिवाळी सणानिमित्त शासनातर्फे रेशन दुकानावर 'आनंदाचा शिधा' म्हणून साखर, तेल, डाळ, रवा अशा वस्तूंचे किट अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना वाटप केले जात होते. मात्र यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि शेतमजूर पूर्णपणे होरपळला असताना शासनाचा हा आनंदाचा शिधा नेमका कुठे गायब झाला? असा सवाल गोरगरीब नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शासनाने दिवाळीपूर्वी १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची योजना सुरू केली होती. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला १ किलो साखर,१ लिटर तेल, १ किलो चना डाळ, १ किलो रवा असे चार जिन्नस दिले जात होते. त्यामुळे दिवाळीच्या फराळाला हातभार लागत होता.
यंदा मात्र ऑक्टोबर महिना संपत आला तरी रेशन दुकानदारांकडे आनंदाच्या शिध्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. पुरवठा विभागाकडे विचारणा केली असता वरून आदेश नाही असे उत्तर मिळत असल्याचे दुकानदार सांगतात.दुष्काळात अपेक्षा अधिक यंदा उदगीर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हातचा गेला आहे.
शेतमजुरांना रोजगार नाही. अशा परिस्थितीत शासनाने दिवाळीचा शिधा दुप्पट देणे अपेक्षित असताना साधा शिधाही न दिल्याने गरीब कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार आहे. सणाला गोडधोड करायचे तरी कसे? साखर ५० रुपये किलो झाली, तेल १६० च्या पुढे गेले.
शासनाने निदान दिवाळीपुरता तरी आनंदाचा शिधा द्यावा," अशी मागणी तोंडार, लोणी, डोंगरशेळकी,वाढवणा,गुडसुर, भागातील गोरगरीब शेतकरी मजूर यांनी शासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांनी तातडीने लक्ष घालून गोरगरिबांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी होत आहे.
अशा भयान दुष्काळ परिस्थितीत रेशनच्या दुकानावर आनंदाचा शिधा मिळाला नाही, दिवाळी दसऱ्यासाठी रेशनच्या दुकानावर साखर डाळ तेल आली नाही का अशी विचारणा पुरवठा विभागाशी केली असता आत्तापर्यंत कसल्याही प्रकारचे आनंदाचा शिधा आला नाही, असे सांगण्यात आले.एस. ऐ. ईलामले, नायब तहसीलदार पुरवठा विभाग