Udgir black magic case pudhari photo
लातूर

Latur Crime : वीस कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्यासाठी १५ वर्षीय मुलीवर अमानुष विधीचा कट

लातूर-उदगीर मार्गावर घटना उघड; संशयित महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील

पुढारी वृत्तसेवा

उदगीर : २० कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याच्या आमिषातून लक्ष्मीपूजेच्या नावाखाली कथित अघोरी विधी करण्याचा प्रयत्न उदगीर ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला. या विधीसाठी आंध्र प्रदेशातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह पॉक्सो कायद्यांतर्गत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ ऑगस्ट रोजी पहाटे दोनच्या सुमारास लातूर-उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ, उदगीरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला. संशयित आरोपींनी संगनमत करून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेचा विधी करण्याची तयारी केल्याचा प्रथमदर्शनी समोर आला आहे.

या विधीसाठी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणात फुंडलीक देवराव रूपनर, सचिन साहेबराव भोंगळे, अनिकेत सुभाष राठोड यांच्यासह महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पुणे परिसरातील संशयितांचा समावेश आहे.

उदगीर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिलीप गाडे हे रविवारी पहाटे गस्तीवर असताना रात्री दोनच्या सुमारास करडखेल पाटीजवळ एक स्विफ्ट डिझायर कार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांचे वाहन जवळ येताच एक जण कारमधून पळून गेला.

कारमधील अन्य तिघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे पोलिसांनी तिघांना कारसह पोलीस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात कसून चौकशी केली असता संशयितांनी 'लक्ष्मी पूजा' करण्यासाठी आल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी या पूजेचा उद्देश विचारला असता अघोरी जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. १५ वर्षीय मुलीला या कथित विधीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती संशयितांनी दिली.

मुलीवर अमानुष पद्धतीने विधी करून पैशांचा पाऊस पाडण्याचा दावा करण्याचा कट रचण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणातील काही संशयित हैदराबादहून उदगीरला आल्याचे पोलिसांना समजले. ते उदगीर शहरातील बिदर रोडवरील एका पेट्रोल पंपावर थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तेथे बोलेरो जीपमध्ये पाच संशयित आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता पुण्याहून एका ईरटिंगा कारमधून १५ वर्षीय मुलीला उदगीरकडे आणले जात असल्याचे समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने लातूर, मुरूड आणि औसा परिसरात नाकाबंदी केली. पहाटे पाचच्या सुमारास मुरूड येथे नाकाबंदीत संबंधित ईरटिगा कार पकडण्यात आली. या कारमध्ये आणखी पाच संशयित आढळून आले. पोलिसांनी तीनही वाहने ताब्यात घेऊन संशयितांना पोलीस ठाण्यात आणले. दिवसभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली.

जादूटोण्याचे साहित्य जप्त

कारवाईदरम्यान पोलिसांनी काळ्या रंगाची कापडी बाहुली, लाल कुंकू, बारा लिंबू, कापूर, हळद, लाल मातीच्या पणत्या, नारळ, उदबत्ती, लाल मातीची मडकी, यळणी आणि लाल रंगाचा कापडी ब्लाऊज पीस असे साहित्य जप्त केले. याशिवाय संशयितांचे मोबाईल आणि दोन वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT