Two arrested for bar-breaking, vehicle theft
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्ह्यातील वाहन चोरी व बियर बार फोड प्रकरणे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४६ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये लातूर जिल्ह्यात बियर बार, देशी दारू दुकाने फोडून दारू व चारचाकी-दुचाकी वाहने चोरीच्या घटना वाढल्या होत्या. विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या या गुन्ह्यांचा सखोल तपास करून आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विशेष सूचना देऊन तपासगती वाढवण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले होते. १७ नोव्हेंबर रोजी पथकाला बोरोळ येथील एका शेतात दोन ट्रॅक्टर व मोटारसायकलींसह दोन इसम संशयास्पदरीत्या थांबले आहेत अशी गुप्त माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून प्रदीप विष्णु यशवंते (वय २६, रा. देवळा, जि. बीड) आणि शाम ओमकार जमादार (वय २५, रा. मोरंबी, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक) या दोघांना ताब्यात घेतले.
पंचनामा करताना दोघांकडून ५, लाख २० हजार रोख, दोन ट्रॅक्टर आणि दोन मोटारसायकली मिळून आल्या होत्या. चौकशीत त्यांनी त्यांच्या तिसरा साथीदार प्रदीप उर्फ लालु माधव कांबळे, (वय २४ वर्षे रा. बसपुर ता. निलंगा) असे मिळून लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून ५ ट्रॅक्टर, १ पिकअप, २ स्कॉर्पिओ, २ मोटारसायकली चोरी केल्याची तसेच चार बियर बार, देशी दारू दुकाने व बियर शॉप फोडून दारूची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच एका शेतातील सोयाबीनची चोरीकेल्याचेही आरोपींनी सांगितले.
तपासात आरोपींविरोधात लातूर ग्रामीण, रेणापुर, गातेगाव, किल्लारी, उदगीर ग्रामीण, मुरुड, एमआयडीसी, भादा, देवणी तसेच आनंदनगर (धाराशिव) पोलीस ठाण्यांतील एकूण १५ गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत ४६ लाख ४५,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई एसपी अमोल तांबे व एएसपी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.