NEET UG Re Exam Latur pudhari photo
लातूर

NEET UG Re Exam Latur : ‘नीट यूजी’ पुनर्परीक्षेसाठी लातूर पोलिसांची कडक सुरक्षा

पारदर्शक , निर्विघ्न परीक्षेसाठी व्यापक नियोजन

पुढारी वृत्तसेवा

लातूर : देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेली ‘नीट यूजी’ पुनर्परीक्षा २१ जून २०२६ रोजी होत असून, परीक्षेची पारदर्शकता, गोपनीयता आणि विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी लातूर जिल्हा पोलिस दलाने व्यापक सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेपूर्वी सर्व बंदोबस्त अधिकारी, जिल्हा समन्वय अधिकारी, संपर्क अधिकारी, केंद्र अधीक्षक, वाहतूक नियंत्रण अधिकारी, एस्कॉर्ट पथके तसेच परीक्षा केंद्रांवरील समन्वय अधिकारी यांची विशेष बैठक घेण्यात आली.

या बैठकीत परीक्षेचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक अधिकाऱ्याने अत्यंत सतर्कतेने कर्तव्य बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रश्नपत्रिका आणि गोपनीय साहित्याच्या सुरक्षित वाहतुकीसाठी विशेष पोलिस एस्कॉर्टची नियुक्ती करण्यात आली असून साहित्याच्या हालचालीवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे.

परीक्षा केंद्रांवर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून पुरेशा प्रमाणात पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.परीक्षा केंद्रांच्या परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष गस्त पथके कार्यरत आहेत. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे .

बंदोबस्तात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यादरम्यान मोबाईल अथवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरास मनाई करण्यात आली असून प्रभावी समन्वयासाठी वॉकी-टॉकी संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत, अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT