Three members of the same family killed in horrific accident near Gharani
चाकूर, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील घरणीजवळ झालेल्या दोन मोटरसायकलच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले आहेत. यामध्ये आई, मुलासह जावयाचा मृत्यू झाला आहे. यामुळे घरणी गावावर शोककळा पसरली आहे.
चाकूर तालुक्यातील घरणी येथील यशोदाबाई धोंडीराम शिंदे (वय ५५) त्यांचा मुलगा विठ्ठल धोंडीराम शिंदे (वय ३८) आणि त्यांचे जावई लालासाहेब शेषेराव पवार (वय ३७) रा. सर्व घरणी येथील रहिवाशी असून ते यशोदाबाई या आजारी असल्यामुळे त्यांना घरणीहून एमएच २४ बीक्यू ६८३७ मोटारसायकलवरून चाकूरकडे दवाखान्यात घेवून जात होते.
यावेळी पाठीमागून लातूरहून येणाऱ्या एमएच २६ बीएन ७०७२ स्पोर्ट बाईकस्वाराने घरणी जवळील जुन्या पुलावर पाठीमागून त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला आहे.
या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतावर आज (मंगळवार) ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चाकूर ते अष्ठामोड दरम्यान राष्ट्रीय महामार्गांवर दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.