Three lakhs stolen by breaking the window of a jeep in Latur
लातूर, पुढारी वृतसेवा : येथील औसा रोडवर थांबवलेल्या जीपच्या खिडकीची काच फोडून जीपमध्ये २९ लाख ७० हजार रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवली. शनिवारी (दि.२०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भर दिवसा वर्दळ असलेल्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने लातूरात खळबळ उडाली असून चोरट्याच्या शोधार्थ सात पथके रवाना झाली आहेत.
चाकूर तालुक्यातील महाळंग्रा येथील रहिवाशी तथा कंत्राटदार मार्शल माने हे त्यांच्या मजुराचे पेमेंट करण्यासाठी शनिवारी जिपने लातूरला आले होते. त्यांच्या जीपमध्ये २९ लाख ७० हजार रुपये असलेली बॅग होती. दरम्यान त्यांनी त्यांची गाडी औसा रोडवर असलेल्या आयसीआयसीआय बँकेसमोर थांबवली.
जीपची दारे बंद करून ते बँकेत पैसे काढण्यासाठी गेले तेवढ्यात अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाडीच्या खिडकीची काच फोडली व पैशाची बॅग पळवली. माने बँकेतून परत गाडीकडे आले असता त्यांना गाडीची काच फोडल्याचे व पैसे असलेली बॅग चोरी गेल्याचे कळाले त्यांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर हे घटनास्थळी दाखाल झाले व त्यांनी पाहणी केली. या घटनेची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे.
सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळाले आहे त्यात दोघेजण गाडीच्या खिडकीतून बॅग काढत असल्याचे दिसत आहे, त्याची तपासणी केली जात आहे. दोन संशयीत असून लवकरच चोरटे आमच्या हाती लागतील असे उपविभागीय पोलिस अधिकारी समीर साळवे यांनी सांगितले.