

Lumpy disease in cattle in Latur
जावेद शेख
उदगीर, पुढारी वृत्तसेवा : उदगीर तालुक्यात अतिवृष्टीच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवले आहे. तालुक्यात लंपी आज-ाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, एकूण ८८ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. ३ जनावरे दगावली असून ३३ जनावरे बरी झाली आहेत. सध्या ५५ जनावरे बाधित आहेत.
तालुक्यात आतापर्यंत १४ हजार ७०० गुरांचे लसीकरण झाले असले तरी अनेक गावे लसीकरणापासून वंचित राहिली असल्याची नाराजी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गाय, वळू व बैल या गोवंशीय जनावरांना प्रामुख्याने लस देण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांचा शेतीसोबतचा दूध उत्पादनाचा जोडधंदाही धोक्यात आला आहे. लंपीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांना मदत मिळायची, मात्र आता ती मदत बंद झाल्याने शेतकऱ्यांचे हाल आणखी वाढले आहेत.
लंपी सारखा संसर्गजन्य आजार वाढत असताना तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप लसीकरण झालेले नाही. प्रशासन व पशुवैद्यकीय विभागाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे असे माजी सरपंच उत्तमराम बिरादार यांनी सांगितले.
उदगीर तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव असला तरी तो आटोक्यात आहे. जनावरांच्या गोठ्यांची व परिसराची स्वच्छता हा ८०% उपाय आहे. औषधोपचार २०% प्रभावी ठरतात. शेतकऱ्यांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे. गरज भासल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकगुमार घोनसीकर यांनी सांगितले.