Latur News : यंदा पिकांवर गोगलगायींचा फारसा प्रादुर्भाव नाही  File Photo
लातूर

Latur News : यंदा पिकांवर गोगलगायींचा फारसा प्रादुर्भाव नाही

कृषी अधिकारी कांबळे : अवकाळीमुळे गोगलगायींची सुप्तावस्था संपुष्टात

पुढारी वृत्तसेवा

There is not much snail infestation on crops this year

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा: दोन वर्षांपूर्वी तालुक्यात ५१० हेक्टरवरील सोयाबीन फस्त करणाऱ्या पैसा (मिलीपीड) व शंखी गोगलगायींची यावर्षीच्या मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुप्त अवस्था संपुष्टात आली असावी. त्यामुळेच त्यांचा फारसा प्रादुर्भाव दिसून येत नाही, असा अंदाज रेणापूर तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी व्यक्त करीत, गोगलगायीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या उपाय योजनांचा अवलंब करावा, असे आवाहन नितीन कांबळे यांनी केले आहे.

पावसाळा सुरु झाला की गोगलगायी व पैसा नैसर्गीकरित्या हमखास दिसतात. एकदा त्यांचा प्रादुर्भाव वाढला की त्यावर नियंत्रण करणे खर्चीक तर असतेच, परंतु ते आवाक्याबाहेर जाते. दोन वर्षापूर्वी नेमके असेच झाले होते. कृषी विभागाच्या शाखज्ञांनी सुचविलेल्या उपायानुसार खरीप हंगामात प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच खोल नांगरट करणे गरजेचे असते.

जेणेकरून जमिनीच्या खालच्या थरात लपलेल्या गोगलगायी जमिनीवर येऊन कडक उन्हामुळे त्या नष्ट होतात. यावर्षी मे महिन्यातच मोठा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत सुप्त अवस्थेत असलेल्या गोगलगायी जमिनीवर आल्या असाव्यात. या कालावधीत त्यांना खाद्य न मिळाल्यामुळे त्या नैसर्गीकरित्या मरण पावल्या असाव्यात. अवकाळी पावसामुळेच त्यावर नियंत्रण झाल्याने यावर्षी गोगलगायीचा फारसा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत नाही.

याउपरही गोगलगाय दिसत असतील तर बांधाच्या आतील बाजूने मेटाडीहाईड २.५ टक्के व बांधाच्या सात फुट अंतरावर एक गोळी टाकावी, याला गोगलगाय आकर्षीत होऊन ती गोळीला चाटते. त्यानंतर ती ४ ते ५ तासाने मरण पावते. सोयाबीन उगवणीनंतर शेतात गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्यास खेलकिल औषधिच्या गोळ्या टाकाव्यात. रोप अवस्थेत असताना रात्री शेतात गवताचे ठिग किंवा सुतळी बारदाना पाण्यात भिजवून प्रति एकरी दहा ठिकाणी ठेवावा. सकाळी त्या जमा करुन साबन किंवा मिठाच्या पाण्यात टाकुन नष्ट कराव्यात, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे व प्रभारी मंडळ कृषी अधिकारी वैभव चव्हाण यांनी केले आहे.

गतवर्षी ५१० हेक्टरवर झाले होते पीक नुकसान

तालुक्यात दोन वर्षापूर्वी पैसा (मिलीपीड) व शंखी गोगलगायीमुळे रेणापूर महसुल मंडळात ९७.४ हेक्टर, पळशी महसुल मंडळात ८९.६ हेक्टर, पोहरेगाव १२९.९ हेक्टर, पानगाव ८६ हेक्टर तर कारेपूर १०४ हेक्टर असे एकुण ५१० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाले होते. या क्षेत्रावर शेतकर्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली होती. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता.

विषारी चुरमुरे शेतात टाकू नये

गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कांही शेतकरी विषारी औषध चोळलेले चुरमुरे शेतात टाकुन गोगालगायीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र विषारी चुरमुरे खाल्याने पशु पक्षी दगावण्याचा धोका असतो. त्यासाठी शेतकर्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT