रेणापूर : व्यक्तीमत्वाला वेगळेपण देणाऱ्या रेणापुरी टोपींची आज भलेही भुरळ नसली तरी कधी काळी हिच टोपी अनेकांसाठी त्यांच्या व्यक्तीमत्वाची जणू ओळखच बनली होती. लातूर जिल्ह्यातील ही टोपी उभ्या महाराष्ट्राला परिचीत झाली होती. आज तिचा वापरच जेमतेमवर आल्याने ती केवळ आठवणी पुरतीच राहते की काय ? असे अनेकांना वाटत आहे. Renapuri Topi
या टोपीच्या निर्मितीची कहाणी मोठी रंजक आहे. पूर्वी खादीची गांधी टोपी जवळपास सारेच वापरायचे. स्वातंत्र्यांनतर आपल्या गावची ओळख देणारी एखादी टोपी असावी, असे येथील काही पुढाऱ्यांना वाटले. त्यांनी ही इच्छा आपल्या मित्रांनाही सांगितली व इथेच या टोपीच्या निर्माणावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर त्यावेळचे गावचे प्रसिध्द शिंपी गोपाळराव आकनगिरे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी टोपीचा प्राथमिक आराखडा तयार केला. त्यानंतर त्यात पुढाऱ्यांनी अनेक सुधारणा सुचवल्या व आकनगिरे यांनी टोपी तयार केली . अन सर्वांनाच ती भावली. Renapuri Topi
तीन ते चार इंच उंची , 22, 23, 24 इंच लांबी अशा आकारात टोप्या असतात. ही टोपी प्रथम रेणापूरचे तत्कालीन माजी सरपंच डॉ. महादप्पा पनुरे, सिद्रामअप्पा हलकुडे, आर. के. पाटील, निळकंठराव राजे, गोपाळराव आकनगिरे, सोपानराव कासले, संस्थेचे चेअरमन प्रल्हादराव आकनगिरे, मन्मथआप्पा गिरवलकर, गोपाळराव दरोडे, माधवराव भातीकरे, बाबुराव बस्तापूरे, स्वातंत्र्य सैनिक किसनराव राजे, बाबुराव खोबरे यांच्यासह अनेक गाव पुढाऱ्यांनी ही वापरायला सुरुवात केली.
या टोपीला राजकीय क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पूर्वी कोणत्याही राजकीय सभेत किंवा कसल्याही कार्यक्रमात रेणापुरी टोपी परिधान केलेल्या पुढाऱ्यांची ओळख वेगळीच असायची, मंडळी काही कामानिमित्त मुंबईला गेली की मंत्री असोत या आमदार त्यांना नाव गाव विचारतच नसत केवळ " रेणापुरी टोपी " पाहुनच रेणापूरचे नेते अशी त्यांची ओळख व्हायची.
या ओळखीचा पुढाऱ्यांना त्यावेळी मोठा सन्मानच वाटायचा . पुढे तर प्रत्येकाला हे वेगळेपण हवेहवेसे वाटू लागले. परिणामी अनेक गावकऱ्यांच्या डोक्यावर या टोप्या दिसू लागल्या. गेल्या ७० वर्षांपासून या टोपीचा वापर केला गेला. परंतु, आज हॅटसह विविध आधुनिक कॅपला स्वीकारलेल्या नव्या पिढीला रेणापुरी टोपीचे काहीही आकर्षण राहिलेले नाही. त्यामुळे आता त्या आठवणी पुरत्याच राहणार आहेत.
स्वातंत्र्यानंतर १९५० च्या दरम्यान रेणापुरी टोपी तयार झाली. इतर टोप्यांपेक्षा रेणापूरच्या पुढाऱ्यांची टोपी वेगळी असावी, अशी कल्पना तत्कालीन गाव पुढाऱ्यांनी व्यक्त केली. त्यातुन टोपीची लांबी रुंदी व उंची याचे नियोजन केले गेले. ही टोपी शिवण्यासाठी रेणापूर येथील गोपाळराव आकनगिरे या टेलरला सांगण्यात आले. त्यांनी हवी तशी टोपी आम्हाला शिवून दिली. आज या टोपीला ७० वर्ष झाले. आजही मी ही टोपी वापरतो.
निळकंठराव राजे, माजी सरपंच रेणापूर
हेही वाचा