Ten thousand bhakari collected on one message, villages mobilized for Maratha reservation
लातूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील समाज बांधवांच्या जेवणाची तेथील हॉटेल बंद असल्याने काहीशी आबाळ होत असल्याने ती दूर करण्यासाठी जिल्ह्यातील समाज बांधव सरसावले आहेत. हे आंदोलन सुरू असेपर्यंत आपल्या बांधवांना चटणी भाकरी पुरवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
या अन्नसेवेसाठी शनिवारी (दि.२९) सकाळी समाज माध्यमावरून आवाहन करण्यात आले व बघता बघता दहा हजार भाकरी अर्धा क्विंटल चटणी संकलीत झाली. रविवारी ती खासगी बसने मुंबईस पाठवण्यात आल्याचे समाज बांधवांनी सांगितले.
मुंबई येथील आरक्षण आंदोलनात राज्यभरातील मराठा समाजबांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाला आहे. मुंबईतील समाज बांधव आपापल्या परीने आंदोलक बांधवांच्या नाश्ता जेवणाची काळजी घेत आहेत. मात्र संख्या मोठी व हॉटेल बंद असल्याने काहीशी कसरत होत आहे.
भावांनो ही अडचण दूर करा असे आवाहान समाज बांधवांच्या वतीने रविवारी सकाळी विविध व्हाट्सअॅप ग्रुपवरुन करण्यात आले व बघता बघता सायंकाळपर्यंत दहा हजारांपेक्षा अधिक भाकरी व सुमारे ५० किलो चटणी संकलित झाली. हे साहित्य दिलेल्या ठिकाणी समाज बांधवांनी आणून दिले. शेवटी अधिक भाकरी येत असल्याने त्या खराब होऊ नयेत म्हणून आजच्या दिवशी त्या पाठवू नका उद्या आम्ही कळवले तर पाठवा, असे आवाहान करावे लागले. यापुढे भाकरी दशम्या, धपाटे फराळ बिस्किट असे लवकर खराब न होणारे पदार्थ पाठवले जाणार आहेत.