ईट : जिल्हा व विभागातील सर्वाधिक विद्यार्थी संख्येची ओळख निर्माण केलेल्या ईट येथील आदर्श जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी, विविध पुरस्कार आणि उपक्रमांमध्ये ठसा उमटवणाऱ्या या शाळेतील सुमारे 1 हजार 170 विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षकांअभावी अडचणीत आले आहे.
ईट येथील पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद प्रशाला ही धाराशिव जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजी माध्यमाची जिल्हा परिषद शाळा असून ईट परिसरातील 15 ते 17 गावांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. सध्या इयत्ता पहिली ते पाचवी 476, सहावी ते आठवी 406, तर नववी व दहावी 288 असे एकूण 1,170 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी एकूण 34 शिक्षक पदे मंजूर असताना त्यापैकी 14 पदे रिक्त आहेत.
विशेषतः सेमी इंग्रजी माध्यमासाठी अत्यावश्यक असलेले गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक अनेक महिन्यांपासून उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिव यांना वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटी घेऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
अखेर या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन सादर केले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या ई-मेलची दखल घेत संबंधित विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्याचा रिप्लाय प्राप्त झाला आहे.
‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय व विभागीय पुरस्कार, सलग तीन वर्षे दहावीचा 100 टक्के निकाल, स्पर्धा परीक्षांमधील यश, पीएम श्री नामांकन व 100 वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या या शाळेकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षकांची तातडीने भरती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी होत आहे.