Take a decision on farmer loan waiver in the convention: Former MLA Dheeraj Deshmukh
लातूर, पुढारी वृत्तसेवा पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधीत वाढ याबाबतचा अंतिम निर्णय घेऊन राज्य सरकारने कार्यवाही करावी आणि संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली.
पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार, असे आश्वासन महायुतीने निवडणुकीपूर्वी दिले होते.
शेतकरी सन्मान निधी योजनेतून मिळणाऱ्या निधीत ३ हजार रुपयांची वाढ करण्याचे वचनही दिले होते. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याची सध्या गरज असताना राज्य सरकारकडून या विषयांकडे दुर्लक्ष केले जात आहे. टाळाटाळ केली जात आहे, असे धीरज देशमुख यांनी सांगितले.
मागील महिन्यात अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांसमोर होते. आता पेरण्या झाल्यानंतर पाऊसच नाही. त्यामुळे पिके जगवायची कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काही ठिकाणी तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. पण, पेरणीसाठी जवळ पैसा नाही, अशी स्थिती आहे.
संकटाची ही मालिका संपत नसल्याने शेतकरी दरवर्षी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यात शेतीमालाला योग्य भाव नाही. लाखाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची ही व्यथा समजून घेऊन सरकारने सरसकट कर्जमाफी लागू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी धिरज देशमुख यांनी केली.