Sunita Waghmare Chairperson Ashwini Mane Deputy Chairperson Pudhari
लातूर

Nilanga PS Election | निलंगा पं.स.तीत ‘महिलाराज’; सभापतीपदी सुनीता वाघमारे, उपसभापतीपदी अश्विनी माने

Latur News | निलंगा पंचायत समितीमध्ये एकूण २० जागापैकी १३ जागा भाजपकडे

पुढारी वृत्तसेवा

Sunita Waghmare Chairperson Ashwini Mane Deputy Chairperson

निलंगा : निलंगा पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनीता संतोष वाघमारे तर उपसभापतीपदी अश्विनी बालाजी माने यांची बिनविरोध निवड झाली. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पंचायत समिती आल्याने दोन्ही पदांवर महिलांना संधी देण्यात आली असून समितीत ‘महिलाराज’ निर्माण झाल्याची चर्चा आहे.

सभापती व उपसभापती निवडीसाठी सोमवारी (दि. ९ मार्च) पंचायत समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपविभागीय अधिकारी शरद झाडके हे पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. सभापतीपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने सुनीता वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, तर उपसभापतीपदी अश्विनी माने यांची निवड करण्यात आली.

सुरुवातीला काँग्रेसकडून पंचायत समिती सदस्य किरण सुधाकर पाटील यांनी उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतल्याने दोन्ही पदांची निवड बिनविरोध झाली.

नुकत्याच झालेल्या निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असून तेथील विषय समित्यांमध्येही महिलांना संधी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पंचायत समितीतही महिलांना नेतृत्वाची संधी देण्यात आल्याचे सांगितले जाते.

निलंगा पंचायत समितीमध्ये एकूण २० जागा असून त्यापैकी १३ जागा भाजपकडे, तर ७ जागा काँग्रेसकडे आहेत. बहुमत भाजपकडे असल्याने सभापती व उपसभापती पदांची निवड बिनविरोध झाली. निवडीनंतर पंचायत समितीच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT