नरसिंग सांगवीकर
अहमदपूर : कांद्याची पारंपरिक रोपलागवड पद्धत न वापरता थेट बियाणे पेरणीचा प्रयोग अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील प्रगतशील शेतकरी विश्वनाथ हेगणे यांनी यशस्वीपणे केला आहे. बैलचलित पेरणी यंत्राच्या सहाय्याने त्यांनी कांद्याच्या बियाण्यांची थेट पेरणी करून शेतीतील खर्च, वेळ व मजूर समस्येवर पर्याय निर्माण केला आहे.
पारंपरिक पद्धतीत कांद्याचे बी टाकून वाफे तयार केले जातात. सुमारे 40 ते 45 दिवसांत रोपे तयार झाल्यानंतर ती शेतात पुनर्लागवड केली जाते व तीन महिन्यांनंतर पीक काढणीस येते. ही पद्धत खर्चिक व वेळखाऊ असून मजुरांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते.याच्या तुलनेत थेट पेरणी पद्धतीत कांद्याचे बियाणे पेरणी यंत्राद्वारे थेट शेतात पेरले जाते.
या पद्धतीत दोन रोपांमध्ये तीन इंच व दोन ओळींमध्ये सहा इंच अंतर ठेवले जाते. रेन पाईपद्वारे पाणी दिल्यानंतर 10 ते 12 दिवसांत उगवण होते. उगवणीनंतर 15 दिवसांनी डीएपी व इतर खतांची मात्रा देण्यात येते. पुढे 40 ते 50 दिवसांनी 14:35:14 या खताची मात्रा देणे आवश्यक असल्याचे हेगणे यांनी सांगितले.
श्रीरामपूर येथील प्रयाग ॲग्रोटेक यांनी विकसित केलेल्या पेरणी यंत्राचा व्हिडीओ पाहून हा प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी सोयाबीन, तूर, मूग, टोमॅटो व भाजीपाला अशी पिके पारंपरिक पद्धतीने यशस्वीपणे घेतली आहेत. सध्या त्यांनी प्रयोग म्हणून एक एकर क्षेत्रावर कांद्याच्या बियाण्यांची थेट पेरणी केली आहे.
मजूर टंचाईवर प्रभावी पर्याय
नवनवीन प्रयोग करून प्रत्यक्ष शेतीत अंमलबजावणी करणे मला आवडते. कधी यश तर कधी अपयश येते; मात्र अनुभवातूनच शेतकरी पुढे जातो. सध्या मजूर वेळेवर उपलब्ध नसल्याने व कांदा लागवडीचा खर्च वाढल्याने थेट पेरणीचा पर्याय शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरत आहे, असेही हेगणे यांनी नमूद केले.
बैलचलित पेरणी यंत्राद्वारे कांद्याची थेट पेरणी केल्याने पुनर्लागवडीचा खर्च वाचतो. पारंपारिक पद्धतीपेक्षा सुमारे एक महिन्याचा वेळ वाचतो. कांद्याचा आकार एकसमान येत असल्याने बाजारभावही चांगला मिळतो. सध्या मजूर टंचाई असल्यामुळे ही पद्धत शेतकऱ्यांसाठी सुलभ ठरत आहे.विश्वनाथ हेगणे