Spacious hostel for farmers' daughters in Latur
लातूर, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी शेतमजुरांच्या मुलींना उच्च शिक्षण घेता यावे व त्यांना राहण्यासाठी जिल्हा पातळीवर सुविधा उपलब्ध करून द्यावी यासाठी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आ. अमितजी देशमुख, माजी आ. धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीने नवीन गूळ मार्केट रींग रोड बाजार परिसरात राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब मुलींचे वसतिगृह या नावाने अत्याधुनिक व प्रशस्त वसतिगृह सुरू केले असून शेतकरी शेतमजूर यांच्या मुलींना वसतिगृह ऊपलब्ध करुन देणशेतकरी, ारी राज्यातील लातूर बाजार समिती पहिली आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापति जगदीश बावणे यांनी दिली.
वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या मुलींना अल्प दरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक मुलीसाठी टेबल, कपाट, खुर्ची तसेच शुद्ध पाणी उपलब्ध आहे. वसतिगृहात १०० टक्के महिला कर्मचारी सेवा देणार आहेत. लातूर तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना अल्प दरात राहण्याची व्यवस्था होणार असून याचा फायदा ग्रामीण भागातील मुलींना होणार आहे.
राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी या वसति गृहासाठी विशेष लक्ष पुरवले होते. शेतकरी कन्यांची निवासस्थाना अभावी होणारी परवड दूर व्हावी यासाठी या कामास त्यांनी प्राधान्यक्रम दिला होता. ही वास्तू सुंदर सुरक्षीत व अत्याधुनिक सुविधांनी संपन्न आहे. प्रशस्त अभ्यासिका, ग्रंथालय, भोजनालय, चोवीस तास सुरक्षा, वीज, शुध्द पाणी अशा अनेक सुविधा या वसतिगृहात आहेत.
या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर तालुक्यातील ११ वी १२ वी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या विद्यार्थिनी अथवा त्यांच्या पालकांनी या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे उपसभापती सुनील पडिले, संचालक मंडळ व सचिव अरविंद पाटील यांनी केले आहे.