

जिजाऊ माँसाहेबांना अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड होती. त्या गरिबाप्रती कारुण्यमूर्ती होत्या. त्यामुळे त्या निर्भीड आणि लढवय्या होत्या. बाल शिवबाला मांडीवर बसवून महिलावर अत्याचार करणार्या रांजे गावच्या बाबाजी गुजरला त्यांनी कठोर शिक्षा ठोठावली. राज्यातील सर्व स्त्रिया आणि लहान मुलांचे रक्षण झालेच पाहिजे, हा नियम जिजाऊंनी घालून दिला. राज्य नीतिमूल्यांची जोपासना करणारे असले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. त्या न्यायनिष्ठूर होत्या. जिजाऊंच्या चरित्रातून आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा.
राजमाता जिजाऊमाँसाहेब यांची ओळख केवळ शिवरायांच्या माता एवढीच मर्यादित नाही, जसे त्यांनी शिवरायांना घडविले, तसेच नातू संभाजीराजांनाही घडविले. त्यांनी आपले क्रांतिकारक पती शहाजीराजे यांच्या महत्त्वाकांक्षी आणि शौर्यशाली कार्यकर्तृत्वाला तशीच खंबीरपणे साथ दिली. त्या प्रजेला अत्यंत मायेने वागविणार्या, स्वराज्याचा आधारवड होत्या. जिजाऊंना लहानपणापासूनच राजनीती, युद्धकला आणि धार्मिक शिक्षण मिळाले. त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले, ज्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास, धैर्य आणि न्यायाची भावना खोलवर रुजली. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना केवळ आईचे प्रेमच दिले नाही, तर त्यांना एक उत्तम राजा बनवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व शिक्षण दिले. त्यांनी रामायण, महाभारत आणि इतर वीर पुरुषांच्या कथा सांगून त्यांच्या मनात शौर्य, न्याय आणि प्रजेबद्दल प्रेमाची भावना जागृत केली. 17 व्या शतकातील भारताच्या इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या केवळ एक राजमाता नव्हत्या, तर एक कुशल प्रशासक, दूरदर्शी राजकारणी आणि पुत्रासाठी प्रेरणास्रोत होत्या. त्यांच्या कणखर नेतृत्वाने आणि मार्गदर्शनाने शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.
जिजामाता या हिंमतवान, कर्तृत्ववान आणि बुद्धिमान होत्या. बालपणापासूनच त्या तलवारबाजी, प्रशासन, घोडेस्वारी आणि युद्धकलेत निपूण होत्या. वडील लखुजीराजे आणि आई म्हाळसादेवी यांनी त्यांना कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करता वाढविले. जिजाऊंनी आपल्या जीवनात अनेक दु:खद घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या. वडील आणि भावांची देवगिरीच्या भरदरबारातील हत्या, दीर, पुत्र यांनी रणांगणावर लढता-लढता सोडलेले प्राण उघड्या डोळ्यांनी पाहिले. जिजाऊ या संकटसमयी लढणार्या होत्या, रडणार्या नव्हत्या. अनेक संकटे आली तरी त्या नाऊमेद झाल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, खचल्या नाहीत, तर त्या संकटाला सामोरे जाणार्या धैर्यशाली होत्या. त्यांनी बालशिवबाला मांडीवर बसवून खेड शिवापूर येथे न्यायनिवाडा केला. अन्यायग्रस्त शेतकर्यांना न्याय दिला. महिलांवर अन्याय अत्याचार करणार्या नराधमांना शिक्षा ठोठावल्या. जिजाऊ करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या. तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातील प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. त्यांचे स्वत:चे गुप्तहेर खाते होते. त्यामार्फत त्या शिवबाला सतत सतर्क करत असते. तसेच त्या उत्तम न्यायाधीश होत्या. पूर्वी दिलेले अन्यायी निवाडे फिरवून पुन्हा योग्य न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले.
शिवाजीराजे जेव्हा पन्हाळा किल्ल्यावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकले होते, तेव्हा जिजाऊंनी हातात तलवार घेतली. घोड्यावर बसल्या आणि राजगडावरून पन्हाळगडाकडे निघाल्या. त्याप्रसंगी त्या म्हणतात “आता जाते आणि त्या सिद्दीला ठार करून शिवबाला सोडवून आणते”. या प्रसंगाचे रसभरित वर्णन समकालीन कविंद्र परमानंदाने ‘शिवभारत’ या ग्रंथात केलेले आहे.
यावरून स्पष्ट होते की, जीवघेण्या प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत बसणार्या नव्हत्या; तर हातात तलवार घेऊन रणांगण गाजविणार्या शूरवीर होत्या. त्यांना आपल्या परंपरेचा अभिमान होता; पण भाबडेपणाने पूजाअर्चा करण्यात त्यांनी संकटसमयी वेळ दवडला नाही. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले; पण स्वराज्याचा आधारवड आधारवड, प्रेरणा जिजामाता होत्या. जिजाऊंचे अनंत उपकार आपल्यावर आहेत, असे शाहीर अमर शेख लिहितात.
जिजाऊंनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. सर्व जातीधर्मातील लोकांना अत्यंत मायेने-ममतेने आपुलकीने वाढविले. त्या काळात स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तिला ‘मावळा’ म्हटले जात असे. ‘मावळाई’ या इंद्रायणी खोर्यातील प्राचीन काळातील मातृसत्ताक महामातेच्या नावावरून ‘मावळा’ हा शब्द आला, असे प्राच्यविद्या पंडित डी. डी. कोसंबी म्हणतात. ‘मावळा’ हा शब्द स्त्रीप्रधान संस्कृतीचा आदर करतो. तसाच तो शब्द भेदभाव बाळगत नाही. मावळा म्हणजे आपण सर्वजण. जिजाऊंनी मावळ्यांना आपुलकी, जिव्हाळा, आधार दिला.
शिवाजीराजेे आग्रा कैदेत असताना स्वराज्य हिमतीने राखण्याचे कार्य जिजाऊंनी केले. पती निधनानंतर सती न जाता, पुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या ग्रंथप्रामाण्यवादी किंवा अंधश्रद्धाळू नव्हत्या. म्हणूनच त्यांनी सतीप्रथा लाथाडली. ही मध्ययुगीन काळातील क्रांतिकारक घटना आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाला झालेला विरोध मोडून राज्याभिषेक पार पाडणे यात जिजाऊंची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
त्या जशा राजकीय विरोधकांच्या विरुद्ध लढल्या तशाच त्या सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरुद्धही लढल्या. जिजाऊ या पराक्रमी, धैर्यशाली होत्या. त्या गरिबांची सावली होत्या. राजमाता जिजाऊ या हिंमतवान, कर्तृत्ववान आणि पराक्रमी होत्या. त्या शिवाजीराजांच्या मार्गदर्शक दीपस्तंभ होत्या, असे वस्तुनिष्ठ इतिहासकार कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, वा. सी. बेंद्रे, डॉ. जयसिंगराव पवार सांगतात, तर डॉ. बाळकृष्ण सांगतात की, जिजाबाई आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ होत्या. अर्थात सर्वांना मायेची सावली देणार्या जिजाऊ होत्या. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा. वंशाला दिवा फक्त मुलगाच असतो, असे नाही तर मुलगीही वंशाला दिवा असते. घराघरात शिवाजीराजे संभाजीराजेसारख्या विचारांची पिढी निर्माण करावयाची असेल तर घरोघरी जिजाऊसारख्या माता निर्माण होणे, गरजेचे आहे.